न्युयॉर्क | 18 सप्टेंबर 2023 : तुमच्या कार असो वा बाईक तुम्हाला ड्रायव्हींग करताना टायर पंक्चरची भीती वाटतच असते. परंतू ओहियोतील एक कंपनी SMART ( शेप मेमरी अलॉय रेडीयल टेक्नॉलॉजी ) ने अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था नासा ( NASA ) हीच्या मदतीने रोव्हर टायरच्या तंत्राने प्रेरित होऊन खास एअरलेस टायर विकसित केले आहेत. ही काही जगातील पहिलीच कंपनी नाही जिने एअरलेस टायरचे संकल्पना मांडली आहे. याआधी ब्रिजस्टोन, मिशिलीन आदी कंपन्यांनी असे टायर आणले आहेत. स्मार्टचे एअरलेस टायर विक्रीसाठी तयार आहेत.
अंतराळात वापरात येणाऱ्या तंत्रज्ञानाने प्रेरित होऊन SMART ने हे एअरलेस टायर तयार केले आहेत. नासाने चंद्रावर पाठविलेले मून रोव्हर आणि मंगळावर पाठविलेले रोव्हर ज्या तंत्राचा वापर करते, तेच तंत्रवापरले आहे. सध्या सायकलींसाठी हे टायर तयार केले आहेत. भविष्यात कार आणि बाईक्ससाठी देखील टायर तयार केले जाणार आहेत. या टायरची वेगळ्या पद्धतीची कॉईल-स्प्रिंग अंतर्गत रचनेमुळे कधीच खराब होत नाही.अपोलो मोहीमेत अंतराळवीरांनी वापरलेल्या लूनार टेरेन वाहनांच्या धर्तीवर मेटल पासून हा टायर तयार करण्यात आला आहे. त्यामुळे या टायरमध्ये हवा भरायची गरज नाही किंवा पंक्चर होण्याची भीती नसते.
हे टायर रबर ऐवजी धातूंपासून तयार केले जाते. ज्यात स्लिंकी सारख्या स्प्रिंगचा वापर केला जातो. ही स्प्रिंग टायरच्या चारी बाजूंनी असते. ही स्प्रिंग निकेल टायटॅनियम धातूपासून तयार केली जाते. त्याला नीटीनॉल देखील म्हणतात. तो टायटॅनियम सारखा मजबूत आणि रबरासारखा लवचिक असतो. त्यामुळे दबाव येतो तेव्हा त्याचा आकार बदलतो. परंतू पुन्हा पुर्ववत होतो. त्यामुळे धातूचे हे टायर हळूहळू आंकुचन आणि प्रसरण पावतात. त्यामुळे सामान्य रबराच्या टायर सारखेच ते कार्यरत रहातात.
स्मार्ट कंपनी या क्रांतीकारी मेटल टायरला एका कॅंपेन अंतर्गत क्राऊडफंडींगच्या साईटवर विकत आहे. कंपनीने तिचे फायनान्शिय टार्गेट पूर्ण केले आहे. लवकरच सर्वसामान्यासाठी हे टायर बाजारात विक्रीसाठी देखील दाखल होणार आहेत. हे एअरलेस टायर ऑटो सेक्टरला आमुलाग्र बदलून टाकतील असे म्हटले जात आहे.