ॲमस्टरडॅम : नेदरलँड्समध्ये त्वचेच्या कॅन्सरच्या ( Skin Cancer) वाढत्या प्रकरणांना तोंड देण्यासाठी डच सरकारने आपल्या नागरिकांना मोफत सन प्रोटेक्शन (sun protection) देण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अंतर्गत डच सरकार उन्हाळ्यात शाळा, विद्यापीठे, पार्क्स, खुली सार्वजनिक ठिकाणे येथे (मोफत) सनस्क्रीन उपलब्ध करून देणार आहे. गार्डियनच्या रिपोर्टनुसार, नेदरलँड सरकारला देशातील त्वचेच्या कॅन्सरचे वाढते प्रमाण कमी करायचे आहे. यासाठी लोकांचे उन्हापासून संरक्षण करणे आवश्यक आहे.
अशा परिस्थितीत देशातील प्रत्येक नागरिकाला ही सुविधा उपलब्ध करून देण्याची योजना सरकारने आखली आहे. सरकारच्या या मोहिमेनंतर देशातील प्रत्येक नागरिकाला सनस्क्रीन लावण्याची सवय लागेल, त्यामुळे देशातील घातक आजारांची व त्या आजाराच्या रुग्णांची संख्या कमी होईल, अशी डच अधिकाऱ्यांना आशा आहे.
अशी मिळाली सनस्क्रीन वाटण्याची आयडिया
रिपोर्टनुसार, ही कल्पना एका क्लिनिकच्या स्किन डॉक्टरची आहे, असे एका डच अधिकाऱ्याने सरकारच्या या योजनेबद्दल बोलताना नमूद केले. ज्याप्रमाणे कोरोनाच्या काळात मोफत सॅनिटायझर दिल्यानंतर लोकांना त्याची सवय झाली, त्याचवरून त्या डॉक्टरला ही कल्पना सुचली. अशा परिस्थितीत लोकांना मोफत सनस्क्रीन दिल्यास काही काळानंतर त्यांनाही ते वापरण्याती सवय होईल, असा विचार करून ही मोहीम राबवण्यात येणार आहे.
लहान मुलांना लागावी सवय
यासोबतच मुलांना लहानपणापासूनच सनस्क्रीन लावण्यास उद्युक्त करावे म्हणजे त्यांना त्याची सवय लागेल, असे अधिकारी सांगतात. ‘ या योजनेसाठी थोडा खर्च होत आहे, पण या (सनस्क्रीन वाटपाची) ही मोहीम आपल्या लोकांच्या आरोग्यासाठी खूप महत्वाची असल्याचे, त्या अधिकाऱ्याने नमूद केले.
अनेक लोक नियमितपणे सूर्यप्रकाशाचा आनंद लुटतात, पण ते स्वतःच्या त्वचेचे संरक्षण करण्याचा विचार करत नाही, असे अधिकारी म्हणाला. विशेष म्हणजे संपूर्ण युरोपमध्ये गेल्या दोन दशकांत त्वचेच्या कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे.
सूर्याची हानिकारक अल्ट्राव्हायोलेट किरणे हे त्वचेच्या कॅन्सरचे प्रमुख कारण आहे. त्याच्या संपर्कात आल्याने त्वचेच्या कॅन्सरचा धोका वाढतो.