नवी दिल्ली | 6 ऑक्टोबर 2023 : इराणमधील महिला मुक्तीचा लढा (Women Freedom Fight) उभे जग पाहत आहेत. तर तिथली जनता अनुभवत आहे. Moral Policing च्या नावाखाली, तिथं महिलांवर अगणित अत्याचार आणि बंधन लादण्यात आली आहे. हिजाब, बुरखा विरोधात तिथे मोठ्या प्रमाणात महिला रस्त्यावर उतरल्या आहेत. लांबसडक केस कापून त्यांनी यापूर्वीच सरकारचा निषेध केला आहे. या सर्व लढ्यात नर्गिस मोहम्मदी (Nargis Mohammadi) या आघाडीवर होत्या. ती एक पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ती आहे. तिला तिच्या अतुलनीय साहसाबद्दल आणि महिलांसाठी उभारलेल्या लढ्याबद्दल गौरवण्यात आले आहे. तिला शांततेचा नोबेल पुरस्कार (Nobel Peace Prize 2023) देण्यात आला आहे.
नर्गिस महिलांचा आवाज
नर्गिसने महिलांसाठी मोठा लढा उभारला आहे. त्यासाठी तिला अनंत यातना सहन कराव्या लागला. तिचा छळ करण्यात आला. तिला अनेकदा तुरुंगात डांबण्यात आले. तिच्या कुटुंबियापासून तिला दूर लोटण्यात आले. तिला आतापर्यंत 13 वेळा अटक करण्यात आली. तिला 31 वर्षांचा तुरुंगवास ठोठावण्यात आला. गेल्या अनेक वर्षांपासून ती तुरुंगात आहे. तिला 154 फटक्यांची शिक्षाही सुनावण्यात आली होती. इराण सरकारविरोधात आवाज उठवल्याने तिला अटक करण्यात आली आहे. सध्या ती तुरुंगातच आहे.
51 वर्षांच्या नर्गिस निडर
महिलांच्या स्वातंत्र्यासाठी, त्यांचे हक्क, अधिकारासाठी नर्गिसचा अविरत लढा सुरु आहे. तिची हयातच तुरुंगात गेली म्हणा ना. नर्गिसने एक पुस्तक पण लिहिले आहे. व्हाईट टॉर्चर, असे या पुस्तकाचं नाव आहे. त्यात कैद्याचं दुःख, त्यांच्यावरील अत्याचाराची माहिती देण्यात आली आहे. त्यांना यापूर्वी 2022 मध्ये या पुस्तकासाठी रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर्स (RSF) हा पुरस्कार देण्यात आला आहे.
मृत्यूदंडाची शिक्षा करा समाप्त
विरोधकांचा, कार्यकर्त्यांचा आवाज दाबण्यासाठी इराण सरकार मृत्यूदंडाचा गैरवापर करत असल्याचे अनेकदा उघड झाले. काही दिवसांपूर्वी डोक्यावर स्कार्प न घेतलेल्या एका तरुणीचा मॉरल पोलिसांनी जीव घेतल्याचे समोर आले होते. त्याविरोधात इराणमधील महिलाच नाही तर पुरुषांनी पण मोठे आंदोलन केले होते. नर्गिसने ही मृत्यूदंडाची शिक्षा संपविण्याचे आवाहन केले आहे.
महिलांसाठी तीन दशकांचा संघर्ष
भौतिकशास्त्र हा नर्गिस यांचा आवडता विषय आहे. यामध्ये त्यांनी करिअर केले. त्यांनी अभियांत्रिकीची शिक्षण पण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी स्थानिक आणि परदेशी वृत्तपत्रासाठी लिखाण सुरु केले. त्यानंतर त्या महिलांवरील अत्याचार आणि दडपशाहीविरोधात पुढे आल्या. 1990 मध्ये त्यांनी लढा उभारला. त्यांना 2011 मध्ये पहिल्यांदा अटक करण्यात आली. पण त्या थांबल्या नाही. दोन वर्षांच्या तुरुंगावासानंतर त्यांना जामीनावर सोडण्यात आले. पण 2015 मध्ये पुन्हा तुरुंगात टाकण्यात आले. गेल्या आठ वर्षांपासून त्या जुळ्या मुलांपासून दूर तुरुंगात आहेत.