North Korea: उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन याने आता संपूर्ण जगासमोर नवे संकट उभे केले आहे. हुकूमशहा किम जोंग उन याने नवीन एक नवीन कायदा लागू केला आहे. हा कायदा उत्तर कोरियाच्या लष्कराला परस्पर शत्रूंवर आण्विक (nuclear war) हल्ले करण्याचा अधिकार देतो. उत्तर कोरियाच्या या निर्णयाने साऱ्या जगाला चिंतेत टाकले आहे. उत्तर कोरियामध्ये क्षेपणास्त्र चाचण्या (nuclear test) आणि आण्विक शस्त्रास्त्रांवर अनेकदा चर्चा होत असते. दरम्यान, उत्तर कोरियाचा हुकूमशहा आपल्या अण्वस्त्रे आणि क्षेपणास्त्राचा परीघ वाढविण्यात कायमच गुंतलेला असतो. अण्वस्त्रांबाबत (nuclear weapons) उत्तर कोरियाचा नवा कायदा संपूर्ण जगासाठी चिंतेचा विषय आहे. संयुक्त राष्ट्रांचे प्रमुख अँटोनियो गुटेरेस यांनीही उत्तर कोरियाच्या अण्वस्त्रांबाबतच्या नवीन कायद्याबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे.
संयुक्त राष्ट्राचे प्रवक्ते स्टीफन डुजारिक यांनी शुक्रवारी सांगितले की, संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस हे उत्तर कोरियाच्या नवीन कायद्याबद्दल अत्यंत चिंतित. अँटोनियो गुटेरेस यांनी प्योंगयांगला चिरस्थायी शांतता आणि कोरियन द्वीपकल्पाच्या पूर्ण आणि सत्यापित अण्वस्त्रमुक्तीसाठी प्रमुख पक्षांशी पुन्हा चर्चा सुरू करण्याचे आवाहन केले आहे.
अण्वस्त्रांबाबत उत्तर कोरियाचा नवा कायदा अत्यंत चिंताजनक असल्याचे अँटोनियो गुटेरेस यांचे मत आहे.
उत्तर कोरियाच्या संसदेच्या सदस्यांनी अण्वस्त्रांच्या वापराबाबत कायदा संमत केला आहे. हा कायदा उत्तर कोरियाच्या लष्कराला परस्पर शत्रूंवर आण्विक हल्ले करण्याचा अधिकार देतो. याआधी हुकूमशहा किम जोंग याने अमेरिका किंवा इतर कोणत्याही देशाकडून धमकी दिल्यास उत्तर कोरिया अण्वस्त्रांचा सक्रिय वापर करण्यास मागेपुढे पाहणार नाही, असा इशाराही दिला होता.
अमेरिकेला आमची अण्वस्त्र शक्ती संपवायची आहे. उत्तर कोरियाला कमकुवत करून राजवट स्थापन करायची असल्याचा आरोप किम जोंगने केला आहे. उत्तर कोरियाने आपल्या धोरणात्मक आण्विक मोहिमेची व्याप्ती सतत वाढवली पाहिजे, जेणेकरून आण्विक युद्धाची क्षमता मजबूत करून शत्रूला चोख प्रत्युत्तर देता येईल, असे किम जोंग म्हणाले होते.