भारतात लोकसभा निवडणुकीचे धुमशान सुरु आहे. 1 जून रोजी शेवटच्या सातव्या टप्प्यातील मतदान होत आहे. त्यानंतर 4 जून रोजी कोणाचे सरकार सत्ताकेंद्री असेल हे स्पष्ट होईल. निकालाच्या अंदाजामुळे पाकिस्तान आणि लष्कर सध्या अस्वस्थ झाले आहे. निवडणुकीच्या संभामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानच्या अणुबॉम्बविषयी चिमटे काढले होते. त्यामुळे पाकिस्तानी लष्कर आता पोकळ धमक्या देत सुटलं आहे.
गरज पडली तर अणुबॉम्बचा वापर
पाकिस्तानच्या अणुबॉम्बची सुरक्षा आणि देखरेख नॅशनल कमांड अथॉरिटीकडे आहे. या संस्थेचे प्रमुख सल्लागार लेफ्टनंट जनरल (निवृत्त) खालिद अहमद किडवई यांचे वक्तव्य चर्चेत आले आहे. अणुबॉम्बविषयी पाकिस्तानचे ‘नो फर्स्ट यूज’ असे कोणतेही धोरण नाही. आमचा अणुबॉम्ब तयार आहे. भारत ‘नो फर्स्ट यूज’ धोरणाचे पालन करतो. पण पाकिस्तान गरज पडली तर अणुबॉम्बचा हल्ला करु शकतो, अशी धमकी त्यांनी दिली.
अणुबॉम्ब वापराविषयी धोरण पहिल्यांदाच समोर
पाकिस्तानचे अणुबॉम्ब वापराविषयीचे धोरण पहिल्यांदाच समोर आले आहे. आतापर्यंत भारताने ‘नो फर्स्ट यूज’ धोरण जाहीर केलेले आहे. एखाद्या देशाने अणुबॉम्बचा वापर केला तर प्रतिहल्ल्यात अणुबॉम्बचा वापर करण्यात येईल, असे भारताचे धोरण आहे. पण पाकिस्तानने अणुबॉम्बच्या वापराविषयीचे धोरण जाहीर केलेले नव्हते. पहिल्यांदाच एका सेमिनारमध्ये किडवई यांनी हे धोरण समोर आणल्याचे पाकिस्तानमधील वृत्तपत्र डॉनने त्यांच्या वृत्तात स्पष केले आहे.
लोकसभा निकालापूर्वीच पाकिस्तानी सैन्यात भीती?
भारतातील सुरक्षा तज्ज्ञांनी ‘नो फर्स्ट यूज’ धोरण देशासाठी घातक असल्याने ते बदलण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली होती. त्याचे पडसाद उमटले होते. त्याविषयी कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. पण तिसऱ्यांदा मोदी सरकार येण्याचा अंदाज येताच पाकिस्तानी सैन्यात अस्वस्थता वाढल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. पाकिस्तानकडे अणुबॉम्ब असल्याने तो भारताच्या डोळ्यात डोळे घालून पाहु शकतो आणि त्याच्या समोर कधीच झुकणार नाही, हे भारतीय नेतृत्वाने आता तरी ओळखायला हवे, अशी फुशारकी किडवई यांनी मारली.
पीएम मोदींच्या चिमट्यानंतर थयथयाट
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका मुलाखतीत पाकिस्तानच्या अणुबॉम्बविषयी चिमटा काढला होता. काँग्रेसवर निशाणा साधताना त्यांनी हा वार केला होता. त्यानंतर किडवई यांनी त्याला उत्तर दिले आहे. बदलत्या तंत्रज्ञानाचा वापर करत पाकिस्तान अणुकार्यक्रम पुढे नेत असल्याचे ते म्हणाले. पाकिस्तान लष्कर, नौदल आणि हवाई दलाकडे अणुबॉम्ब असल्याचा दावा किडवई यांनी केला. पाकिस्तानचा अणुबॉम्ब भारताचा 2750 किमीपर्यंतचा परिसरवर निशाणा साधू शकतो, असे ते म्हणाले.