नवी दिल्ली | 9 फेब्रुवारी 2024 : आपला शेजारील देश पाकिस्तानात 8 फेब्रुवारी रोजी संसदीय निवडणूका पार पडल्या. आज या निवडणूकांचे निकाल येत आहेत. या निकालांचा अंदाज पाकिस्तानात भारताचे उच्चायुक्त म्हणून काम केलेल्या अजय बिसारिया यांनी आधीच वर्तविला होता. अजय बिसारिया यांनी दावा केला होता की पाकिस्तानातील निवडणूका अफरातफरीच्या असतील. अर्थात पाकिस्तानात नवीन सरकार तयार करण्यात तेथील आर्मीच मोठा रोल निभावत आहे. माजी पंतप्रधान आणि परांगदा झाल्यानंतर पुन्हा देशात परतलेले नवाझ शरीफ यांची पीएमएल-एन पार्टीच पुन्हा सत्तेत येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. आता येत असलेल्या निवडणूक निकाल आणि सुरुवातीच्या अंदाजानूसार नवाझ शरीफ यांचा पक्ष सर्वात मोठी पक्ष म्हणून नंबर एकवर येऊ शकतो असे म्हटले जात आहे.
पाकिस्तानात आतापर्यंत घोषीत झालेल्या निकालानूसार नवाझ शरीफ यांच्या पीएमएल-एनला 13 जागा, इमरान खान यांचा पक्ष पीटीआयच्या वतीने अपक्ष निवडणूक लढलेले 12 सदस्य आणि बिलावल भुट्टो यांच्या पीपीपी पक्षाने 8 जागा जिंकल्या आहेत. नवाझ शरीफ यांची मुलगी मरियम नवाझ या देखील निवडणूक जिंकल्या आहेत. इमरान खान जेलमध्ये बंद असून त्यांनी तेथूनच सत्तेचे डावपेच खेळत आहे.
नवाझ शरीफ यांचे घराणे पाकिस्तानातील उद्योगपतींचे घराणे आहे. त्यांनी भारताबद्दल उदारमतवादी भूमिका घेतली होती. त्यांनी भारताशी संबंधाचा त्यांच्या निवडणूक प्रचारातही वापर केला होता. तरीही तेच पंतप्रधान असताना पाकिस्तानी लष्कराचे प्रमुख जनरल परवेझ मुशर्रफ यांनी कारगिलमध्ये घुसखोरी केली होती. परंतू कारगिल युद्धानंतर त्यांनी भारताशी संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आमंत्रणावरुन साल 2014 मध्ये ते भारत दौऱ्यावर आले होते. मोदी देखील कोणत्याही पूर्व घोषीत कार्यक्रमाशिवाय नवाझ यांच्या मुलीच्या लग्नाला पाकिस्तान गेले होते. निवडणूक प्रचारात नवाझ यांचे एक वाक्य खूपच चर्चेत आले होते. ते म्हणाले शेजारील देश ( भारत ) चंद्रावर पोहचला आणि पाकिस्तान भाकरीसाठी संघर्ष करतोय. नवाझ शरीफ यांच्या सत्तेत येण्याने पाकिस्तानचे अन्य देशांबरोबरील संबंधांना नवा आयाम मिळू शकणार आहे.
पाकिस्तानातील निवडणूकासंदर्भात भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने कोणतीही अधिकृत प्रतिक्रीया दिलेली नाही. नवी सरकारची स्थापना झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यावर अधिकृत रित्या शुभेच्छा पाठवतील असे म्हटले जात आहे. इस्लामाबाद स्थित भारतीय उच्चायुक्तालयात काम केलेल्या एका माजी अधिकाऱ्याने दिलेल्या माहीतीनूसार आत्ताच काही बोलणे घाईचे ठरेल असे म्हटले आहे. पाकिस्तान मोठ्या घडोमोडीतून जात आहे. इमरान खान यांच्या पार्टीने पाठींबा दिलेले उमेदवार निवडून येत आहेत. कोणत्याही एका पार्टीला सरकार बनवण्यासाठी बहुमत मिळणे कठीण दिसत आहे. येथे मिली जुली सरकारच येण्याची शक्यता आहे. भारताने नेहमी एक शांतता प्रिय, स्थिर आणि मजबूत पाकिस्तानचे समर्थन केले आहे.
भारतात लोकशाही व्यवस्था आहे. पाकिस्तान लोकशाही आकार घेत असतानाच लष्कराच्या हस्तक्षेपाने ती तुटली जात आहे असे माजी परराष्ट्र सचिव सलमान हैदर यांनी म्हटले आहे. पाकिस्तान अणू हत्याराने संपन्न आहे. परंतू तेथे सैन्याचा वरचष्मा राहीला आहे. पाक आता आर्थिक संकटात सापडला आहे. तेथे कट्टरवाद्यांची चलती आहे. इराण आणि पाकिस्तानात तणाव वाढला आहे. अफगाणिस्तानी सीमाभागातील अतिरेकी देखील पाकची डोकेदुखी बनले आहेत. तर आर्थिक तंगीमुळे पाकिस्तान दिवाळखोर बनला असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.