नवी दिल्लीः पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे प्रचंड मोठी हानी झाली आहे. पुराच्या पाण्यात मृत झालेल्या नागरिकांचा आकडा आता 1200 च्या पुढे गेला आहे. त्यामुळे पाकिस्तानमधील (Pakistan Heavy Rain) परिस्थिती बिकट झाली आहे. अतिवृष्टीमुळे अनेक गावं पाण्याखाली गेल्यामुळे नागरिकांवर बेघर होण्याची वेळ आली आहे. त्यामुळे या काळात इतर देशांतून पाकिस्तानला मोठ्या प्रमाणात मदत पाठवली जात आहे. पूरग्रस्तांच्या (Flood) मदतीसाठी संयुक्त अरब अमिरातीतून 9 आणि उझबेकिस्तानमधून पहिले विमान शुक्रवारी रात्री दाखल झाले आहे. पाकिस्तानातील अतिवृष्टीचा फटका 30 लाखांच्या (30 Lakhs) वर नागरिकांना बसला आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून शुक्रवारी स्पष्ट करण्यात आले की, पाकिस्तानातील अतिवृष्टीमुळे आतापर्यंत 1208 नागरिकांना आपला जीव (1208 Death) गमवावा लागला आहे. राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरणाकडून मृतांचा आकडा जाहीर करण्यात आल्यानंतर त्यामध्ये 416 मुले आणि 244 महिला असल्याचे सांगण्यात आले आहे. तर पुरामुळे 6082 लोकं जखमी झाल्याचे त्यामध्ये म्हटले आहे.
तीन दशकांतील हा सर्वाधिक पाऊस असल्याने आणि हिमनद्या वितळल्यामुळे देशाचा एक तृतीयांश भाग पाण्याखाली गेला आहे. सिंध आणि बलुचिस्तान प्रांतांना पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे. गिलगिट बाल्टिस्तानला भेट दिल्यानंतर पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी सांगितले की, पुरामुळे झालेल्या जीवितहानीमुळे आपल्याला खूप दुःख झाले असून देशभर विध्वंस झाला आहे. तुम्ही कुठेही पाहिला तरी त्यामध्ये तुम्हाला विध्वंसाशिवाय काहीच दिसणार नाही.
इतर देशांमधून येणारी मदत
पाकिस्तानातील परराष्ट्र मंत्र्यांलयाकडून सांगण्यात आले आहे की, कतार आणि संयुक्त अरब अमिरातीतून मदत सामग्रीसह विमानं दाखल झाली आहेत. तर त्याचवेळी तुर्कीकडून ट्रेनमधून पूरग्रस्तांसाठी मदत पोहचविण्यात येत आहे.
पाकिस्तान सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशाचे सुमारे 10 अब्ज डॉलरचे नुकसान झाले आहे. या आठवड्याच्या प्रारंभी पाकिस्तान आणि संयुक्त राष्ट्रांनी संयुक्तपणे सांगण्यात आले होते की, या वाईट परिस्थितीमध्ये मोठी मदत उभी केली जाईल. पाकिस्तानातील अतिवृष्टीमुळे 3.3 दशलक्ष लोकांना या दुर्घटनेचा फटका बसला आहे. त्याचबरोबर 10 लाखांहून अधिक घरांचे नुकसानही झाले आहे.