लाहोर: पाकिस्तान सरकारने (Pakistan) इस्लामाबादमध्ये हिंदू मंदिर (Hindu Temple) उभारण्यास परवानगी दिली आहे. काही दिवसांपूर्वी या मंदिराचे काम थांबवण्यात आले होते. पाकिस्तानातील काही कट्टरतावाद्यांच्या विरोधामुळे मंदिराच्या निर्माणात अडथळा येत होता. मात्र, सरकारने आता पुन्हा या मंदिराच्या निर्माणाला सुरुवात करण्याचा निर्णय घेतला आहे. (Pakistan Govt approves plot for Lord Krishna Temple)
यासाठी राजधानी विकास प्राधिकरणाने सोमवारी लाहोरमध्ये एक अधिसूचना जारी केली. त्यानुसार एच-9/2 येथे हिंदू स्मशानभूमीच्या कामकाजासाठी देखील परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे स्मशानभूमीच्या चारी बाजूंनी भिंतीचे कुंपण उभारता येणार आहे.
पाकिस्तानातील धार्मिक मंत्री पीर नुरुल हक कादरी यांनी मंदिराच्या निर्माणाचा विषय इस्लामी धार्मिक परिषदेकडे विचारविनिमयासाठी पाठवला होता. ऑक्टोबरमध्ये धार्मिक परिषदेने इस्लाम किंवा देशाच्या अन्य भागात मंदिर निर्माणावर शरिया कायद्यानुसार कोणतीही बंदी नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यानुसार मंदिर निर्माणाला आणि स्मशानभूमीच्या कामकाजाला परवानगी देण्यात आली.
इस्लामाबादच्या एच-9 भागात कृष्ण मंदिरासाठी 20 हजार स्क्वेअर फुटांचा भूखंड मंजूर करण्यात आला. साईट मॅप आणि कागदपत्रांची प्रक्रिया रखडल्यामुळे मंदिराच्या कामकाजाला उशीर झाला होता. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या काळात मंदिरासाठी हा भूखंड निश्चित करण्यात आला होता. मंदिराच्या जवळच स्मशानभूमीही असणार आहे. याशिवाय, अन्य धार्मिक विधींसाठीही जागा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. हिंदू समाज हा पाकिस्तानातील सर्वात मोठा अल्पसंख्याक समूदाय आहे. पाकिस्तानात साधारण 75 लाख हिंदू राहतात. सिंध प्रांतात हिंदू लोकांची संख्या लक्षणीय आहे.
संबंधित बातम्या:
अयोध्येतील राम मंदिर 3 वर्षांत उभं राहणार, विहिंपला विश्वास
(Pakistan Govt approves plot for Lord Krishna Temple)