नवी दिल्लीः पाकिस्तानात गेल्या काही दिवसांपासून पूरस्थिती निर्माण झाली आहे. पाकिस्तानमध्ये (Pakistan) मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) विविध भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक घरातून पाणी शिरल्याने लोकांना स्थलांतर व्हावे लागले आहे. जनजीवन विस्कळीत झाल्याने जीवनावश्यक वस्तूंचाही तुटवडा निर्माण झाला आहे. पाण्यामुळे आणि घाणीचे साम्राज्य पसरल्याने मोठ्या प्रमाणात लोक आजारी पडले आहेत. गंभीर आजारांची परिस्थिती (Critical illness conditions) निर्माण झाली असली औषधांचा तुटवडाही निर्माण झाला आहे. जी काही औषधं मिळत आहेत, त्यांच्या किंमतीही भरमसाठ वाढल्याने पाकिस्तानातील परिस्थिती गंभीर झाली आहे. औषधांच्या तुटवड्यामुळे लोकांना उपचार घेता येणे अवघड झाले आहे. गंभीर आजाराने ग्रासलेल्या लोकांसाठी ही जीवन-मरणाचीच लढाई सुरू आहे.
पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात सध्या औषधांचा तुटवडा निर्माण झाल्याने अनेक नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. पाकिस्तानात एकीकडे औषधांचा तुटवडा जाणवत आहे तर दुसरीकडे मात्र औषधांच्या किंमतीत 21 टक्क्यांनी वाढ झाल्याचे सांगण्यात आले आहे.
या समस्येवर पाकिस्तानच्या फार्मास्युटिकल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनकडून सांगण्यात आले आहे की, उत्पादन खर्च जास्त आणि जास्त विक्री करामुळे औषधांच्या उत्पादनावर बंदी घालण्यात आली आहे.
पाकिस्तानात मोठ्या प्रमाणात औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. औषधांचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे उपचार करताना अडचणी जाणवत आहेत. काही नागरिक उपचाराविना तडफडून मृत्यू पावल्याच्या घटनाही घडल्या असल्याचे सांगण्यात आले आहे.
ज्या औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे ती औषधे ना सरकारी दवाखान्यात मिळतात ना खासगी दवाखान्यात त्यामुळे लोकांचा उपचाराविना जीव जात आहे.पाकिस्तानचे औषध नियामक प्राधिकरणानेदेखील औषधांच्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यास असमर्थता दर्शवल्यामुळे ही समस्या निर्माण झाली आहे.
पाकिस्तानातील पुरग्रस्त नागरिकांना मानसिक ताणतणाव, सांधेदुखी, दमा, कर्करोग अशा आजारांनी ग्रासले आहे. तर दुसरीकडे फुफ्फुसातील संसर्ग, रक्त पुरवठा करण्यातही पाकिस्तानी अपयशी ठरले असून औषधांच्या तुटवड्यामुळे लोकांचा हाकनाक जीव जात आहे.
पंजाब प्रांतात मधुमेह, पोटाची जळजळ, रक्तदाब आणि हिपॅटायटीसची औषधे उपलब्ध होणे अवघड होणे कठीण झाले आहे.