महागाईशी झुंजणाऱ्या पाकिस्तानला भीकेचे डोहाळे लागले आहेत. इम्रान खान समर्थकांनी केलेल्या ताज्या हिंसाचाराने या देशाची पावलं गृहयुद्धाकडे तर चालली नाहीत ना, असा दावा करण्यात येत आहे. यापूर्वी मौलानाच्या आंदोलनाने पाकिस्तान ढवळून निघाला होता. त्याच्या समर्थकांनी देशातील प्रमुख शहरांना त्यावेळी वेठीस धरले होते. पण मौलानाला राष्ट्रीय निवडणुकीत करिष्मा दाखवता आला नाही. आता इम्रान समर्थक रस्त्यावर उतरले आहेत. ताज्या हिंसाचारात चार पोलीस मारल्या गेले. तर 100 हून अधिक लोक आणि पोलीस जखमी झाले. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच सरकारने पाकिस्तानी लष्कराला पाचारण केले. अनुच्छेद 245 लागू करण्यात आला. दंगेखोरांना दिसता क्षणीच गोळी मारण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
इमरान खानची सुटका करा
माजी पंतप्रधान इमरान खान हा गेल्या वर्षापासून पाकिस्तानच्या तुरुंगात आहे. 72 वर्षांचे इमरान खान गेल्या वर्षी ऑगस्टपासून तुरूंगात आहे. त्याच्या सुटकेच्या मागणीसाठी समर्थकांनी काल हिंसक आंदोलन केले. त्यांनी संसदेपर्यंत लाँग मार्च काढला. त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी धरणे देण्याची घोषणा केली. पण PTI कार्यकर्ते आणि पोलिसांत जागोजागी धुमश्चक्री झाली. त्यात चार पोलीसांचा जीव गेला. तर अनेक पोलीस गंभीर जखमी झाले. सध्याच्या केंद्र सरकारविरोधात समर्थक आक्रमक झाले आहे. कायद्यातील काही तरतुदीत बदल करून इम्रान खान यांना तुरूंगातच मारण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी लावला आहे. हे हुकूमशाही सरकार असल्याचा आरोप समर्थकांनी केला आहे.
खैबर-पख्तूनख्वापासून मार्च
पाकिस्तानचा महत्त्वपूर्ण भाग असलेल्या खैबर-पख्तूनख्वामध्ये दहशतवादाने डोके वर काढले आहे. या प्रदेशाचे मुख्यमंत्री अली अमीन गंदापूर आणि इमरान खान यांची पत्नी बुशरा बीबी यांच्या नेतृत्वात या प्रांतातून हा लाँग मार्च सुरू झाला. हा मोर्चा राजधानी इस्लामाबाद मधील डी-चौकात येणार होता.. येथून सर्व सरकारी कार्यालये, राष्ट्रपती भवन, प्रधानमंत्री कार्यालय, संसद आणि सर्वोच्च न्यायालयाच्या इमारती अगदी हाकेच्या अंतरावर आहे. पण हा मार्ग शिपिंग कंटेनर लावून बंद करण्यात आला होता. पण आंदोलनकर्त्यांनीच मोठ-मोठ्या क्रेन सोबत आणल्या होत्या. त्यांनी हे कंटेनर बाजूला करत रस्ता मोकळा केला.