नवी दिल्ली : सध्या पाकिस्तान (Pakistan) अत्यंत वाईट परिस्थितीतून जात आहे. आर्थिक समीकरणं बिघडल्याने अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. श्रीमंत, पुढारी, राजकारणी, अधिकारी, नोकरदारवर्ग सोडला तर मध्यमवर्ग आणि गरिबांचे तर जगणे मुश्किल झाले आहे. पाकिस्तानमध्ये इतर धर्मियांची काय अवस्था असेल हे वेगळं सांगायला नको. हिंदूच्या मुलींचे अपहरण, जबरदस्ती धर्मांतरणाच्या अनेक घटना तिथे समोर आल्या आहेत. अशा अराजक परिस्थितीत माजी पंतप्रधान झुल्फिकार अली भुट्टो (Zulfikar Ali Bhutto) यांच्या नातीने सौहार्दचा पैगाम दिला आहे. निकाहनंतर (Marriage) तिने एक मिसाल कायम केली आहे. पण तिच्या या कृत्याने पाकिस्तानातील कट्टरपंथीयांचा तिळपापड झाला आहे. सौहार्दाचा हा पैगाम त्यांना घशाच्या खाली न उतरल्याने ते रस्त्यावर उतरले आहेत.
अत्यंत साधेपणाने केला निकाह
40 वर्षीय फातिमा, या माजी पंतप्रधान दिवंगत बेनझीर भुट्टो यांची भाची आणि मुर्तझा भुट्टो यांची मुलगी आहे. शुक्रवारी त्यांनी अत्यंत साधेपणाने निकाह केला. ग्राहम जिब्रान यांच्यासोबत तिने आयुष्याच्या आणाभाका घेतल्या. त्यांचे पती ग्राहम हे ख्रिश्चन आहेत. ग्राहम अमेरिकन नागरिक आहे. या लग्नात त्यांचे भाव झुल्फिकार अली भुट्टो, जुनिअर आणि काही हिंदू नेते सहभागी झाले. फातिमा या माजी पंतप्रधान झुल्फिकार अली भुट्टो यांची नात आहेत.
वादाला फुटले तोंड
अत्यंत साधेपणाने हा निकाह झाला. वधू आणि वराकडील मंडळी यावेळी उपस्थिती होती. पण रविवारी या जोडप्याने जे केले, त्यामुळे पाकिस्तानातील कट्टरपंथीयांच्या पायाखालची वाळू सरकली. रविवारी हे जोडपे कराची येथील सर्वात जुन्या भगवान शंकराच्या मंदिरात पोहचले. पाकिस्तानातील हिंदू समुदायासाठी हे मंदिर अत्यंत पवित्र आहे. त्यांनी भगवान शंकराच्या पिंडीला जलाभिषेक केला. दूध चढवले आणि मनोभावे प्रार्थना केली.
आणि गजहब उठला
झुल्फिकार अली भुट्टो यांच्या नातीने भगवान महादेवाच्या मंदिरात जाऊन विधिवत पुजा केल्याचे व्हिडिओ, फोटो पाकिस्तानमध्येच नाही तर जगभर पसरले. त्यानंतर कट्टरपंथीय काही काळ गोंधळले. त्यानंतर त्यांनी रस्त्यावर उतरुन त्याला विरोध केला. फातिमा भुट्टोने हा सौहार्दाचा पैगाम दिल्याचे काही नागरिकांना सांगितले तर काहींनी फातिमा मंदिरात कशाला गेली होती, असा सवाल केला. पण मुल्ला-मौलवींनी कडाडून विरोध केला.
सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस
सोशल मीडियावर या मंदिर भेटीचे तीव्र पडसाद उमटले. काही नागरिकांनी फातिमा भुट्टोचे मनमोकळेपणाने कौतुक केले तर कट्टरपंथीय तुटून पडले. काहींनी ती धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली ढोंग करत असल्याचा आरोप केला तर काहींनी तिच्या या कृत्याचे समर्थन केले. तिचे कृत्य पाकिस्तानची प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न असल्याचे काहींना वाटत आहे.
हत्यांचे सत्र
फातिमा यांचे आजोबा झुल्फिकार अली भुट्टो यांचे सरकार उलथवून लष्कर हुकूमशाह जिया उल हक याने, त्यांना फासावर चढवले होते. त्यानंतर झुल्फिकार अली भुट्टो यांची सर्वात मोठी मुलगी बेनझिर भुट्टो यांची डिसेंबर 2007 मध्ये रावळपिंडीत हत्या करण्यात आली होती. तर त्यांचे भाऊ मुर्तजा भुट्टो यांची 1996 साली हत्या करण्यात आली होती. तसेच लहान भाऊ शाहनवाज भुट्टो याची 1985 मध्ये फ्रांसमध्ये हत्या करण्यात आली होती.