नवी दिल्ली | 16 सप्टेंबर 2023 : आर्थिक संकटात सापडलेला पाकिस्तान अणूबॉम्बची निर्मिती मात्र खोऱ्याने करीत आहे. अमेरिकन अणू संशोधकांनी एक अहवाल सादर केला आहे. त्यानूसार पाकिस्तान कंगाल झाला असला तरी त्यांची अणू बॉम्बची निर्मिती जोरात सुरु असल्याचे उघडकीस आले आहे. एकीकडे पाकिस्तानात अनेक वर्षे स्थिर सरकार नाही. दुसरीकडे लष्कराचा तेथे कायम वरचष्मा असताना दिवाळखोरीकडे निघालेल्या पाकिस्तानातील जनतेला महागाईचा सामना करावा लागत आहे. जनतेच्या साध्या मागण्याही पूर्ण करु न शकलेल्या पाकिस्तानी सरकारने अणूबॉम्बची निर्मिती मात्र धडाक्याने सुरु ठेवल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
अमेरिकन डीफेन्स इंटेलिजन्सने साल 1999 मध्ये अंदाज व्यक्त केला होता की साल 2020 पर्यंत पाकिस्तानकडे 60 ते 80 अण्वस्त्र असतील. परंतू या अंदाजाला कलाटणी देत पाकिस्तानने त्याच्यापेक्षा जादा अणूबॉम्ब तयार केले आहेत. अमेरिकन एजन्सीने पाकिस्तानच्या अण्वस्त्रांशी जोडलेले आकडे अनेक गु्प्त कागदपत्रे, मिडीया आणि थिंकटॅंक्सच्या अहवालातून प्राप्त केले असल्याचे सांगण्यात येते.
पाकिस्तानजवळील अणूबॉम्बच्या गु्प्त अहवालाला अमेरिकन संशोधकांनी ‘2023 पाकिस्तान न्युक्लिअर हॅंडबुक’ असे नाव दिले आहे. या अहवालानूसार आजच्या घडीला पाकिस्तानकडे 170 अणूबॉम्ब आहेत. आणि साल 2025 पर्यंत या अण्वस्रांची संख्या 200 च्या पार जाण्याची शक्यता असल्याचे धक्कादायक वृ्त्त आहे. भारतासाठी ही चिंता करण्यासारखी गोष्ट असल्याचे म्हटले जात आहे.
पाकिस्तानकडे न्युक्लिअर क्षमतेच्या क्षेपणास्रांचे किती तळ आणि सुविधा केंद्रं आहेत याची नेमकी माहिती मिळालेली नाही. सॅटेलाईट फोटोंमुळे पाकिस्तानकडे पाच मिसाईल बेस असावेत असा अंदाज आहे. जेथून पाकची आण्विक मिलीटरी फोर्स ऑपरेट करु शकते. पाकिस्तान जमिनीवरुन आणि समुद्री मार्गाने प्रक्षेपित होणाऱ्या क्रुझ मिसाईलमध्ये सातत्याने सुधारणा करीत आहे. भारतही बॅलॅस्टिक मिसाईल डेव्हलप करीत आहे. त्याचा मुकाबला करण्यासाठी पाकनेही 2017 मध्ये मध्यम पल्ल्याची अण्वस्र वाहू शकणारी बॅलॅस्टिक मिसाईल बनविण्याची घोषणा केली होती. तिचे नाव अबाबील ठेवले होते. या मिसाईलच्या चाचणीबाबत कोणतीही माहीती मिळाली नसल्याचे अमेरिकन अहवालात स्पष्ट केले आहे.