नरेंद्र मोदींमुळे यूक्रेनवरचं अण्वस्त्र संकट टळलं; पोलंडच्या मंत्र्याने दिली कबुली

| Updated on: Mar 18, 2025 | 7:35 PM

पोलंडचे परराष्ट्रमंत्री व्लादिस्लाव टेओफिल बार्टोशेव्स्की यांनी रशिया-युक्रेन युद्धात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कूटनीतिक प्रयत्नांचे कौतुक केले आहे. मोदी यांनी पुतीन यांना अण्वस्त्र हल्ला करण्यापासून रोखले, ज्यामुळे एक मोठे संकट टळले आहे. भारताची ही भूमिका वैश्विक शांततेसाठी महत्त्वाची असल्याचे बार्टोशेव्स्की यांनी स्पष्ट केले आहे.

नरेंद्र मोदींमुळे यूक्रेनवरचं अण्वस्त्र संकट टळलं; पोलंडच्या मंत्र्याने दिली कबुली
Polish minister Bartoszewski
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

पोलंडचे परराष्ट्र मंत्री व्लादिस्लाव टेओफिल बार्टोशेवस्की यांनी रशिया आणि यूक्रेनमधील युद्धा दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या कूटनीतीक प्रयत्नांचं कौतुक केलं आहे. यूक्रेन युद्धात रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन हे अण्वस्त्र हल्ला करणार होते. पण मोदी यांनी त्यांना तसं करण्यापासून परावृत्त केलं. मोदींचा हस्तक्षेप अत्यंत महत्त्वाचा ठरला. वैश्विक शांततेच्या प्रयत्नातील महत्त्वाचा मध्यस्थ म्हणून भारताने जी भूमिका घेतली ते खरोखरच वाखाणण्यासारखी होती, असं व्लादिस्लाव टेओफिल बार्टोशेवस्की यांनी म्हटलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वारसॉ दौरा अत्यंत यशस्वी ठरला आहे. मोदींनी पुतिन यांना अण्वस्त्राचा वापर करू नये म्हणून राजी केलं. आम्हाला कायमची शांतता हवी आहे. आम्हाला यूक्रेनमध्ये दीर्घकालीन, स्थिर आणि टिकणारी शांतता हवी आहे, असं बार्टोशेवस्की यांनी सांगितलं.

भारताची महत्त्वाची भूमिका

पुतिन यांनी यूक्रेनवर अण्वस्त्र हल्ला करण्याची धमकी दिली होती. पण भारत आणि चीनच्या प्रयत्नाने हे संकट टळलं. मोदींनी पुतिन यांच्याशी चर्चा केली. त्यांना अण्वस्त्र हल्ला करू नये म्हणून राजी केलं. त्यामुळे पुतिन यांनी आपला निर्णय बदलला आणि जगावरचंही संकट टळलं, असंही त्यांनी सांगितलं.

राष्ट्रपती पुतिन यांनी स्वत: भारताच्या कूटनीतिक प्रयत्नांना मान्यता दिली आहे. पीएम मोदींसह जगातील अनेक नेते युद्ध संपवण्यासाठी प्रयत्नरत आहेत. आपल्या सर्वांकडे देशांतर्गत प्रकरणं आहेत. पण अनेक देशांचे नेते, त्यात भारताचे पंतप्रधान मोदीही आहेत, यूक्रेन आणि रशिया युद्धावर सातत्याने लक्ष ठेवून आहेत. त्यासाठी ते आपला बराच अमूल्य वेळही देत आहेत. आम्ही त्या सर्वांचे आभारी आहोत, असंही त्यांनी म्हटलंय.

एक फोन आला अन्…

बार्टोशेव्स्की यांनी काल ANI ला सांगितले की, “राष्ट्रपती पुतिन यूक्रेनच्या प्रदेशावर सामरिक अण्वस्त्रांचा वापर करण्याची धमकी देत होते. अमेरिकेने त्यांना असं करू नये म्हणून समजावलं, अनेक संदेश पाठवले. पण पुतिन यांच्यावर अमेरिकेच्या संदेशाचा काहीही परिणाम झाला नाही. त्यानंतर त्यांना दोन फोन कॉल आले—एक चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांचा आणि दुसरा भारताचे पंतप्रधान मोदी यांचा. या दोन्ही नेत्यांनी सांगितंल की, चीन आणि भारत दोन्ही स्वतंत्रपणे युद्धाला मंजुरी देत नाहीत. रशियासोबत चांगले संबंध असलेल्या दोन बड्या देशांनी त्यांना असं न करण्याचा सल्ला दिला, त्यानंतर पुतिन यांना आपण जे करतोय हे योग्य नाही हे पटलं. पुतिन यांचं मन वळवण्यात पंतप्रधान मोदी यांचे यात महत्त्वपूर्ण योगदान होते.”

रशियासोबत भारताचे संबंध सातत्याने मजबूत होत आहेत, आणि राष्ट्रपती पुतिन यांनी हे संबंधाचा आपला “विशेषाधिकार” म्हणून वर्णन केलं आहे. दोन्ही देशांमधील सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींचा यूक्रेनचा दौरा भारताच्या तटस्थ दृष्टिकोन आणि शांततेच्या प्रति प्रतिबद्धतेला आणखी बळकट करत आहे. यूक्रेनी राष्ट्रपती व्होलोडिमिर झेलेन्स्की यांनी तर सूचवले की, भारताने युद्ध थांबविण्याचे मार्ग शोधण्यासाठी शिखर परिषद आयोजित करावी, ज्यामुळे देशाच्या वाढत्या जागतिक कूटनीतिक स्थानाचे संकेत मिळतात.

परराष्ट्र मंत्री बार्टोशेव्स्की सध्या दिल्लीमध्ये आहेत आणि ते रायसीना संवादामध्ये सहभागी होण्यासाठी आले आहेत. बार्टोशेव्स्कीसह जगभरातील अनेक इतर दिग्गज नेतेही दिल्लीत आले आहेत. न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सन देखील रायसीना संवादात सहभागी झाले आहेत.