रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये अंदाधुंद गोळीबार करण्यात आला आहे. यामुळे अख्खं मॉस्को शहर हादरलं आहे. एका कॉन्सर्ट हॉलमध्ये पाच बंदुकधारी लोक घुसले आणि त्यांनी गोळीबार सुरु केला. या गोळीबारात 60 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 145 लोक या गोळीबारात गंभीररित्या जखमी झाले आहेत. तर या कॉन्सर्ट हॉलमध्ये आणखी काही लोक अडकले असण्याची शक्यता आहे. या हॉलमध्ये असलेल्या 100 नागरिकांना दंगल विरोधी पथकाने रेस्क्यू केलं आहे. या हल्ल्याच्या काही वेळानंतर इसिस या दहशतवादी संघटनेने याची जबाबदारी स्वीकारली आहे.
रशियावर झालेल्या या हल्ल्यात युक्रेनचा हात असल्याचा दावा करण्यात आला. या आरोपांचं युक्रेनकडून खंडण करण्यात आलं आहे. हे आरोप पूर्णपणे निराधार असल्याचं युक्रेनने आपल्या निवदनात म्हटलं आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर युक्रेनला बदनाम करण्याचा हा डाव आहे. अमेरिकेकडूनही युक्रेनला क्लिनचिट देण्यात आली आहे. यावर रशियाकडून मात्र आक्षेप घेण्यात आला आहे.
रशियात झालेल्या या हल्ल्याचे आंतरराष्ट्रीय स्तरावर पडसाद उमटू लागले आहेत. संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने हा हल्ला घृणास्पद आणि भ्याडपणाचं लक्षण असल्याचं म्हटलं आहे. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी या हल्ल्याया तीव्र शब्दात निषेध केलाय. फ्रान्स देश पीडित आणि त्यांच्या कुटुंबियांप्रति आणि सर्व रशियन लोकांसोबत असल्याचं जाहीर करतो, असं मॅक्रॉन म्हणाले.