रशिया युक्रेन युद्ध
Image Credit source: Social Media
कीव : रशिया आणि युक्रेनमधील युद्धाला (Russia Ukraine war) आज एक वर्ष पूर्ण झाले आहे. 24 फेब्रुवारी 2022 रोजी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनविरुद्ध युद्धाची घोषणा केली. एक वर्षानंतरही या युद्धाला विराम लागलेला नाही. या युद्धात ना कोणाचा विजय झाला आहे ना कोणाचा पराजय झाला आहे. हे युद्ध केवळ दोन देशांपुरतेच मर्यादित नसून याचा परिणाम संपूर्ण जगावर होत आहे. आज एक वर्षाआधी पुतिन यांच्या घोषणेनंतर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनीही टीव्हीवर येऊन जनतेला संबोधित केले होते. पुतिन यांनी युद्ध घोषित केले तेव्हा युक्रेनचा काही दिवसांत पराभव होईल असे वाटत होते पण या युद्धाला आज एक वर्ष पूर्ण झालं. या एका वर्षात कोणीही जिंकले नाही. कोणीही हरले नाही फक्त शहरामागून शहरे उद्ध्वस्त झाली आहेत.
हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे. जे वाचले आहेत ते निर्वासित म्हणून आपले जीवन व्यतीत करत आहेत. रशिया मागे हटण्यास तयार नाही. युक्रेन देखील युद्धाचा सामना करित आहे. या युद्धाचा जागतिक अर्थव्यवस्थेवरही खोलवर परिणाम झाला.
दोन्ही बाजूंनी किती सैनिक मारले गेले?
- या युद्धात रशियाचे 1.80 लाख आणि युक्रेनचे 1 लाख सैनिक मारले गेल्याचा अंदाज आहे.
- युक्रेनने 23 फेब्रुवारी 2023 पर्यंत रशियाच्या 1,45,850 सैनिकांचा मृत्यू झाल्याचा दावा केला आहे. तथापि, युक्रेनने कधीही आपल्या सैनिकांच्या मृत्यूची संख्या सामायिक केली नाही.
- रशियाने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये लष्करी मृत्यूची अधिकृत आकडेवारी दिली होती. तेव्हा रशियाने सांगितले होते की या युद्धात त्यांचे सुमारे 6 हजार सैनिक मारले गेले आहेत.
- तथापि, रशियाच्या न्यूज वेबसाइट मॉस्को टाईम्सने सांगितले आहे की, 17 फेब्रुवारी 2023 पर्यंत रशियाचे 14,709 सैनिक मारले गेले आहेत.
सर्वसामान्यांवर काय परिणाम झाला?
- युद्धाचा सर्वात मोठा फटका सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागतो. 21 फेब्रुवारी रोजी संयुक्त राष्ट्राने या युद्धात सामान्य नागरिकांच्या नुकसानीची आकडेवारी शेअर केली होती.
- या युद्धात युक्रेनमध्ये एका वर्षात 8,006 नागरिकांचा मृत्यू झाल्याचे संयुक्त राष्ट्रसंघाने म्हटले आहे. याशिवाय 13 हजारांहून अधिक लोक जखमी झाले आहेत.
- एवढेच नाही तर या युद्धात 486 मुलांचा मृत्यू झाला असून 954 गंभीर जखमी झाले आहेत. प्राण गमावलेल्यांमध्ये 60 टक्के पुरुष आणि 40 टक्के महिला होत्या.
- याशिवाय, युद्धामुळे एका वर्षात 8 लाख लोकांनी युक्रेन सोडले आहे. तो युरोपियन देशांमध्ये निर्वासित म्हणून जीवन जगत आहे.
- 2.8 दशलक्ष लोकं युक्रेन सोडून रशियात गेले आहेत. त्याच वेळी, 1.5 दशलक्षाहून अधिक लोकांनी पोलंडमध्ये आणि 1.1 दशलक्षाहून अधिक लोकांनी जर्मनीमध्ये आश्रय घेतला आहे.