रशिया-युक्रेनमधील युद्ध (Russia Ukraine War) शिगेला पोहोचले आहे आणि उर्वरित जग ट्विटरच्या माध्यमातून रशियाचे हे हल्ले पाहत आहे. त्यामुळे युद्धाचे नेतृत्व करणाऱ्या दोन्ही देशांच्या नेत्यांच्या व्यक्तिमत्त्वातील फरकही स्पष्ट होत आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) हे गर्विष्ठ आणि निष्ठूर काळजाचे, युद्धाचे खलनायक म्हणून सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, तर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की (volodymyr Zelensky) यांनी प्रतिकूल परिस्थितीला तोंड देताना त्यांच्या विवेकी, धैर्य, शांत आणि आत्मविश्वासाची करिष्माई जादू जगाला दाखवली आहे. हे युद्ध केवळ सोशल मीडियापुरते मर्यादित राहिले असते तर झेलेन्स्की निर्विवाद विजेता ठरला असते. कारण सध्या सोशल मीडियावर फक्त झेलेन्स्कीची हवा आहे. नेता असावा तर असा, असा प्रतिक्रिया लोक सोशल मीडियावर देत आहेत. अफगाणिस्तानवर तालिबानचे आक्रमण झाले तेव्हा तिथले राष्ट्राध्यक्ष पळून गेले. मात्र युक्रेनच्या राष्ट्राध्यांनी जोमाने खिंड लढवली त्यामुळे त्यांचे कौतुक होत आहे.
सोशल मीडियाचा प्रभावी वापर
कठीण काळात सोशल मीडियाचा कसा प्रभावी वापर करायचा हे युक्रेनच्या राष्ट्राध्यांकडून शिकावे, असेही अनेकजण व्यक्त होत आहे. कारण त्यांनी सैन्याचे मनोबल तर वाढवले आहे. मात्र विविध व्हिडिओतून जगाला साद घालत मदतही मिळवली आहे. सोशल मीडियाने आजच्या युद्धाला नवे व्यासपीठ दिले आहे. युक्रेनच्या संकटापूर्वी अफगाणिस्तानात तालिबानचा ताबाही सोशल मीडियावर चर्चेत होता. सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून क्षणोक्षणी आपल्या मोबाईलच्या माध्यामातून युद्धाच्या अपडेट पोहोचत होत्या, युक्रेनच्या बाबत युद्धाबाबत सोशल मीडियावर दर मिनिटाला नवीन व्हिडिओ दिसत आहेत, ज्यामध्ये कधी युक्रेनियन सैनिक आपल्या लोकांसाठी सेल्फी व्हिडिओ रेकॉर्ड करताना दिसतात तर कधी सेंट पीटर्सबर्गमधील युद्धविरोधी निदर्शनांचे फुटेज. 24 फेब्रुवारीच्या पहाटे, युक्रेनवर आक्रमण होण्यापूर्वीच, रशियन सैन्यानी युक्रेनच्या सीमांना वेढा घालण्याची तयारी केली होती, याचे व्हिडिओही समोर आले.
युद्धभूमिवर उतरणारा नेता
युद्धा सुरू झाले तेव्हाही युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांची व्हिडिओ प्रसिद्ध करत सैनिकांचे मनोबल वाढवले. त्यासाठी ते खुद्दही युद्धात उतरल्याचे दिसले. हा व्हिडिओ ज्यामध्ये मातृभूमीबद्दलचे प्रेम दर्शवत आहे. युक्रेनवरील हल्ल्यादरम्यान, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष युद्धभूमिवरून सोशल मीडियावर सक्रिय आहेत आणि त्यांनी केलेल्या आव्हानाद्वारे अनेकांची मने जिंकली आहेत. रशियन आक्रमणाच्या आदल्या दिवशी संध्याकाळी सोशल मीडियावरील त्याच्या पहिल्या रेकॉर्ड केलेल्या संदेशांमध्ये, झेलेन्स्कींनी जनतेला नऊ मिनिटांचा हृदयस्पर्शी व्हिडिओ पाठवला. युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांच्या YouTube चॅनेलवर आणि इतर सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये, झेलेन्स्की म्हणाले – तुम्हाला बातम्यांमध्ये दिसणारे युक्रेन आणि वास्तविक जीवनात युक्रेन – हे दोन पूर्णपणे भिन्न देश आहेत.सोशल मीडियाचा वापर रशियाकडूनही होतोय. रशियन पत्रकार इल्या वेर्लामोव्ह यांनी युक्रेनमधील रशियाच्या आक्रमणाचे रेकॉर्डिंग करण्यासाठी Instagram वापरले आहे.