बांगलादेशमध्ये आगडोंब उसळला आहे. नोबेल पुरस्कार विजेते मोहम्मद युनूस यांचे अंतरिम सरकार गुरुवारी सत्तेवर आले तरीही ही आग विझलेली नाही. देशातील कट्टरपंथी हिंदूसह अल्पसंख्यांकांना लक्ष्य करत आहेत. तर सरन्यायाधीशांसह इतर न्यायाधीशांनी सुद्धा राजीनामे दिले आहेत. आतापर्यंत हजारो लोक मारल्या गेले आहेत. तर संपत्तीच्या नुकसानीचा आकडा धक्कादायक आहे. या हिंसेने बांगलादेशाचे मोठे नुकसान झाले आहे. शेख हसीना यांना पंतप्रधान पदाचा राजीनामा द्यावा लागला. या सर्वांमागे या राष्ट्राचा हात असल्याचा आरोप माजी पंतप्रधान हसीना यांनी केला आहे. या बेटासाठी, जमिनीच्या तुकड्यासाठी हा कट रचल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.
शेख हसीना यांचे राष्ट्राला आवाहन
“मी राजीनामा दिला, कारण मला मृतदेहांचा डोंगर बघायचा नव्हता. त्यांना विद्यार्थ्यांच्या मृतदेहांवरुन सत्ता हस्तगत करायची होती. मी त्याला सहमत नव्हते. मी त्याला विरोध केला. मी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला. सेंट मार्टिन द्वीप, बेट अमेरिकेला सोपवलं असतं तर मी सत्ता टिकवली असती. अमेरिकेला बंगालच्या उपसागरात वर्चस्व निर्माण करायचं आहे. मी देशातील लोकांना आवाहन करते, विनंती करते की त्यांनी या कट्टरतावाद्यांच्या नादी लागू नये. त्यांच्या भूलथापाना बळी पडू नये”, असे आवाहन त्यांनी देशवासीयांना केले. इकोनॉमिक टाईम्समधील वृत्तानुसार, त्यांनी अत्यंत निकटवर्तीयांकडून हा संदेश पाठवला आहे. त्यात देशातील सत्ता पालटामध्ये अमेरिकेचा हात असल्याचा आरोप केला आहे.
मी लवकरच परत येणार
मी जर देशात राहिले असते तर अधिक जणांचे बळी गेले असते. सार्वजनिक मालमत्तांचे अधिक नुकसान झाले असते. अत्यंत कठीण प्रसंगात मी देश सोडण्याचा निर्णय घेतला. जनता माझी ताकद होती. आवामी लीगच्या अनेक नेत्यांची हत्या करण्यात आल्याचे वृत्त ऐकून माझे काळजी पिळवटून निघाले आहे. अनेक ठिकाणी आग लावण्यात आली आहे. तोडफोड करण्यात आली आहे. अल्लाहच्या कृपेने मी लवकरच परत येईल. आवामी लीगने अनेक आव्हानांचा अनेकदा सामना केला आहे. अनेकदा हा पक्ष पुन्हा उभा ठाकला आहे. ज्या राष्ट्राचे स्वप्न माझ्या वडीलांनी पाहिले, प्रसंगी प्राणांची आहुती दिली. ते पूर्ण करण्यासाठी मी पुन्हा परत येईल.
कशाला हवे बेट
चीनविरोधात भक्कम लष्करी तळासाठी अमेरिकेला बांगलादेशच्या ताब्यातील Saint Martin Island बेट गरजेचे आहे. शेख हसीना सरकारवर त्यासाठी दबाव असल्याचा दावा त्यांनी केला. देशातील इतर पक्षांनी पण हाच दावा केला आहे. तर 15 डिसेंबर 2023 रोजी रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने शेख हसीना पुन्हा सत्तेत आल्यास अमेरिका ते सरकार उलथून टाकणार असल्याचा दावा केला होता.