टोकिओ, जपान : जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे (Shinzo Abe) यांची हत्या करणापूर्वी त्याची योजना आखली होती, अशी माहिती खुद्द मारेकऱ्याच्या चौकशीत उघड झाली आहे. तेत्सुया यामागामी या व्यक्तीने शिंजो आबे यांची 8 जुलैला गोळ्या घालून हत्या केली होती. त्यानंतर त्याला घटनास्थळावरून अटक करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास सुरू असताना ही धक्कादायक माहिती पुढे आली आहे. यामागामीने युनिफिकेशन चर्चला (Unification Church) पत्र पाठवून गोळीबाराच्या घटनेपूर्वी नेत्याची हत्या करण्याची योजना आखली असल्याचे म्हटले होते. क्योडो न्यूजच्या वृत्तानुसार, ओकायामा प्रीफेक्चरमधून यामागामीने पश्चिम जपानच्या (Japan) चुगोकू प्रदेशात एका व्यक्तीच्या पत्त्यावर हे पत्र पाठवण्यात आले होते. यासंबंधी पोलिसांनी माहिती दिली. या पत्रात तेत्सुया यामागामीचा चर्चच्या विरोधात संताप आणि असंतोष होता. त्याला कौटुंबिक पार्श्वभूमी होती. तर शिंझो आबे चर्चशी संबंधित असल्याने त्यांची हत्या करण्यात आली.
8 जुलै रोजी निवडणुकीपूर्वी भाषण देताना नारा येथे शिंजो आबे यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. वयाच्या 67व्या वर्षी पंतप्रधान आबे यांनी जगाचा निरोप घेतला. दरम्यान, या पत्रात कोणतीही ओळख उघड करण्यात आली नव्हती. चर्चच्या विषयावरून शिंजो आबे यांच्याबद्दल तिरस्काराची भावना निर्माण झाली होती. आबेंना चर्चविषयी विशेष सहानुभूती असल्याचे पत्रात नमूद होते. पत्रात तेत्सुया यामागामी याने पुढे नमूद केले, की आबे हे त्याचे शत्रू नव्हते. त्याचा राग युनिफिकेशन चर्चवर होता.
शिंजो आबे यांना गोळ्या घालण्यासाठी घरगुती बंदूक वापरणाऱ्या तेत्सुया यामागामीला हल्ल्याच्या ठिकाणी अटक करण्यात आली. त्याने तपासकर्त्यांना सांगितले, की त्याच्या आईने चर्चला देणग्या दिल्या होत्या आणि या देणग्यांमुळे त्याच्या कुटुंबाच्या आर्थिक स्थितीवर परिणाम झाला होता. जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांना गोळ्या घालणाऱ्या तेत्सुया यामागामीच्या आईने युनिफिकेशन चर्चला एकूण 100 दशलक्ष येन (5,75,88,152.64 रुपये) दान केले, असे शूटरच्या काकांनी सांगितले आहे. तेत्सुया यामागामी याने तपास अधिकाऱ्यांना सांगितले, की त्याच्या आईने धार्मिक गटाला दिलेल्या मोठ्या देणग्यांमुळे आणि शिंजो आबे यांचे चर्चशी संबंध असल्यामुळे त्यांच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती उद्ध्वस्त झाली आहे.
क्योडो न्यूजच्या रिपोर्टनुसार, यामागामीची आई 1991 मध्ये तिच्या पतीने आत्महत्या केल्यानंतर चर्चची अनुयायी बनली. तेत्सुया यामागामीच्या काकांच्या मते, तिने चर्चला 60 दशलक्ष येन दान केले जे तिला तिच्या पतीच्या मृत्यूनंतर जीवन विमा पॉलिसीमधून मिळाले होते. याशिवाय, तिने फॅमिली फेडरेशन फॉर वर्ल्ड पीस अँड युनिफिकेशनला 40 दशलक्ष येन दान केले, जे तिला कुटुंबाची रिअल इस्टेट विकल्यानंतर मिळाले होते. तिचे कुटुंब दिवाळखोर झाल्यानंतरही तिने लहान रक्कम दान करणे सुरू ठेवले.