या वर्षांच्या जून महिन्यात अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बॅरी विल्मोर हे अमेरिकन अंतराळवीर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात गेले होते. आता स्ट्रायलायनर स्पेस क्राफ्टच्या बिघाडाने त्यांचा मुक्काम वाढला आहे. दोघेही जण आता थेट पुढच्या वर्षीच फेब्रुवारी महिन्यात पृथ्वीतलावर परतणार आहेत. त्यांच्या परतीचा प्लान बोईंग स्टारलायनर कॅप्सुलच्या तांत्रिक बिघाडामुळे फसला आहे. या मोहिमेत आता स्पेसएक्सचे सीईओ इलॉन मस्क यांच्या स्पेसएक्स खाजगी यानातून आता त्यांना पृथ्वीवर परत आणले जाणार आहे. तर स्पेस स्थानकावर गेलेले स्टारलायनर कॅप्सुल रिकामेच पृथ्वीवर परत येणार आहे. सुनीता विल्यम्स आणि बॅरी विल्मोर हे दोघे अंतराळ स्थानकात अडकल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्याने जगभर खळबळ उडाली आहे.
सुनीता विल्यम्स आणि बॅरी विल्मोर याच्या पृथ्वी वापसीबद्दल सामान्य लोकांना कुतुहूल आहे. त्यांच्याजवळ पर्याप्त जेवण आणि ऑक्सिजन आहे का ? असा सवाल सामान्यांच्या मनात आहे. वास्तविक ते दोघे जण एक आठवड्यांच्या संशोधनासाठी तेथे गेले होते. नासा ऐवजी बोईंग स्टारलायनर यानाची चाचणी करण्यासाठी त्यांना पाठविण्यात आले होते. आता हा प्रकल्प यानातील बिघाडामुळे फसला आहे. नासाने त्याबद्दल खुलासा केला आहे. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात ( ISS ) अनेक देशाचे अंतरराळवीर जाऊन संशोधन करून येत असतात. येथे पुरेसा अन्न साठा आणि ऑक्सिजन उपलब्ध असून अजून तरी काही इमर्जन्सीची स्थिती नसल्याचे नासाने म्हटले आहे. आम्ही सर्व परिस्थितीवर बारीक नजर ठेवून असल्याचे नासाने स्पष्ट केले आहे.
येत्या नव्या वर्षातील फेब्रुवारीमध्ये सुनीता विल्यम्स आणि बॅरी विल्मोर क्रु – 9 मेंबर सोबत परत येतील असे नासाने म्हटले आहे. परंतू त्यांच्या परतण्याची निश्चित वेळ अद्यापही निश्चित ठरली नसल्याचे अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था नासाचे एडमिनिस्ट्रेटर बिल नेल्सन यांनी शनिवारी स्पष्ट केले आहे. स्टारलायनर यानाला 5 जून रोजी चालक दलाच्या दोन सदस्यांच्या सोबतीने लॉंच करण्यात आले होते. परंतू आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकासाठी उड्डाण घेताना यानाच्या 28 थ्रस्टरांपैकी पाच थ्रस्टर वेगवेगळ्या वेळी फेल गेल होते आणि पाच थ्रस्टरमधून हेलियम वायू देखील लीक झाला होता. स्पेसक्राफ्टचे परतीचे उड्डाण देखील 14 जून रोजीच होणार होते. परंतू तांत्रिक समस्या येत गेल्याने अनेक वेळा त्याचे उड्डाण लांबत गेले आणि पृथ्वीवरुन संपर्क करुनही तो बिघाड काही केल्या दुरुस्त करता आला नाही असे म्हटले जात आहे.