मुंबई, इंधनदारवाढ ही फक्त भारताचीच नाही तर जागतिक समस्या बनली आहे. आधी कोरोना महामारी आणि आता रशिया-युक्रेन युद्धाने जगभरातील अर्थव्यवस्थांना हादरवून सोडले आहे. त्यामुळे भारतासह सर्वत्र पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडत आहेत. आता वाढत्या महागाईत जनतेला दिलासा देणारी मोठी बातमी समोर येत आहे. भारताचा शेजारी देश श्रीलंकेत पेट्रोलच्या दरात (petrol rate in Shrilanka ) 40 रुपयांनी कपात करण्यात आली आहे. सरकारने अचानक केलेल्या या घोषणेनंतर लोकांचा आनंद गगनात मावेना झाला आहे.
श्रीलंकेच्या ऊर्जा मंत्री कांचन विजयशेखर यांनी शुक्रवारी सांगितले की, देशातील पेट्रोलच्या दरात 40 रुपयांनी कपात करण्यात आली आहे. आता लोकांना 410 रुपये प्रतिलिटर दराने पेट्रोल मिळणार आहे. पूर्वी ते 450 रुपये प्रतिलिटर दराने विकले जात होते. श्रीलंका सरकारच्या या निर्णयानंतर तेथे काम करणाऱ्या भारतीय कंपनी लंका इंडियन ऑइल कॉर्पोरेशननेही सरकारी किंमतीनुसार पेट्रोलच्या दरात कपात करणार असल्याचे सांगितले आहे.
सरकारच्या या निर्णयामुळे सर्वसामान्यांना महागाईतून दिलासा मिळाला असला तरी व्यावसायिकांना याचा विशेष फायदा झालेला नाही. वास्तविक, सरकारच्या ताज्या निर्णयानंतर श्रीलंकेत पहिल्यांदाच डिझेलचे दर पेट्रोलच्या दरापेक्षा जास्त झाले आहे. श्रीलंकेत डिझेल 430 रुपये प्रति लिटर या दराने विकले जात आहे, तर पेट्रोलचा दर आता 410 रुपये प्रति लिटर झाला आहे. डिझेलच्या दरात कपात न केल्याने व्यापाऱ्यांना व्यावसायिक वाहतूक करणे आणि चालवणे चांगलेच महागात पडत आहे.
कोरोना महामारीनंतर श्रीलंकेची अर्थव्यवस्था रुळावर येऊ शकलेली नाही. चीनसह इतर देशांकडून घेतलेल्या परकीय कर्जामुळे श्रीलंका डबघाईला आलेला आहे. सध्या श्रीलंकेत महागाईचा दर 69.8% वर पोहोचला आहे. आर्थिक संकटातून जात असलेल्या श्रीलंकेला त्याच्या संकटाच्या काळात खास मित्र चीनने देखील पाठ फिरविली आहे. मात्र, खऱ्या शेजाऱ्याची भूमिका बजावत भारताने बरीच मदत केली आहे.