कोलंबो : श्रीलंका (Sri Lanka) सध्या एका मोठ्या आर्थिक संकटातून जात आहे. महागाईचा भडका उडला आहे. दैनंदीन गरजेच्या वंस्तूंची किंमत सर्वसामान्य लोकांच्या आवाक्याबाहेर पोहोचली आहे. भाजीपाल्यापासून ते अन्नधान्यापर्यंत सर्वच वस्तुंच्या दरात अनेक पटींनी वाढ झाली आहे. दिवस – दिवस रांगा लावून देखील पेट्रोल, डिझेल मिळत नाही. श्रीलंकन सरकारकडे वस्तुंची आयात (Import) करण्यासाठी पुरेशाप्रमाणात विदेशी चलनाचा साठा नसल्याने वस्तुंची आयात ठप्प आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून आशीच स्थिती असल्यामुळे आणि परिस्थितीमध्ये कोणतीही सुधारणा दिसत नसल्यामुळे आता श्रीलंकेतील जनता आक्रमक झाली आहे. शनिवारी दुपारी आंदोलकांनी कोलंबोमध्ये राष्ट्रपती भवनाला घेराव घालाता होता. यानंतर राष्ट्रपती गोटबाया राजपक्षे यांनी आपल्या निवसस्थानातून पलायन केले. मात्र तरी देखील आंदोलक शांत झाले नाहीत, त्यानंतर त्यांनी शनिवारी रात्री श्रीलंकेचे पंतप्रधान (Prime Minister of Sri Lanka) रानिल विक्रमसिंघे यांच्या घराला आग लावली.
गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलक श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटबाया राजपक्षे यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. मात्र त्यांनी अद्यापही राजीनामा न दिल्याने आंदोलक आक्रमक झाले. या सर्व पार्श्वभूमीवर श्रीलंकेत शुक्रवारपासूनच कर्फ्यूची घोषणा करण्यात आली होती. कोलंबोमध्ये पोलीस बंदोबस्तात मोठी वाढ करण्यात आली होती. सैन्याच्या अनेक तुकड्या देखील तैनात करण्यात आल्या होत्या मात्र आंदोलक ही सर्व सुरक्षा भेदून राष्ट्रपती भवनात पोहोचले व त्यांनी राष्ट्रपती भवनला घेराव घातला. त्यानंतर त्यांनी रात्री आपला मोर्चा पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांच्या घराकडे वळवला. तिथे सुरक्षारक्षकांकडून आंदोलकांना आडवण्याचा प्रयत्न झाला. लाठीचार्ज आणि आश्रूधुराचा वापर करण्यात आला. त्यामुळे आंदोलक आधिक आक्रमक झाले, व त्यांनी पंतप्रधान विक्रमसिंघे यांच्या घराला आग लावली.
#WATCH | Sri Lanka: Amid massive unrest in the country, protestors set ablaze the private residence of Sri Lankan PM Ranil Wickremesinghe#SriLankaCrisis pic.twitter.com/BDkyScWpui
— ANI (@ANI) July 9, 2022
राष्ट्रपती भवनला आंदोलकांनी घेराव घातला याची गंभीर दखल लोकसभेचे अध्यक्ष महिंदा यापा अभयवर्धने यांनी घेतली. त्यानंतर त्यांनी तातडीने सर्वपक्षातील नेत्यांची बैठक बोलावली. या बैठकीत राष्ट्रपती गोटबाया राजपक्षे आणि पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी सर्वपक्षीय नेत्यांच्या वतीने करण्यात आली आहे. दरम्यान राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांनी काही अटींसह राजीनामा देण्याची तयारी दाखलवली असल्याची माहिती समोर येत आहे. तर दुसरीकडे राष्ट्रपती गोटबाया राजपक्षे यांनी श्रीलंका सोडल्याची माहिती देखील समोर आली आहे.