नवी दिल्लीः गेल्या दोन तीन महिन्यांपासून श्रीलंकेत (Sri lanka) प्रचंड मोठा राजकीय आणि आर्थिक गोंधळ सुरू आहे. काल मात्र त्याच रोषातून आंदोलकांनी राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांच्या अधिकृत निवासस्थानावर धडक मारली, यावेळी आंदोलकांना येथे राष्ट्राध्यक्षांच्या घरामध्ये सुमारे 39 लाख रुपये (1.78 कोटी श्रीलंकन रुपये) (1.78 crore Sri Lankan) रोख सापडले असल्याचे वृत्त देण्यात आले आहे. मात्र आंदोलकांना मिळालेली ही संपूर्ण रक्कम त्यांनी लष्कराकडे सुपूर्द केली आहे. एकीकडे राष्ट्राध्यक्षांच्या बंगल्यावर धडक (Strike on the President’s bungalow) मारून मोठी रक्कम मिळूनही ती रक्कम लष्कराकडे सुपूर्द करण्यात आली, तर दुसरीकडे मात्र राष्ट्रपती भवन ताब्यात घेतल्यानंतर आंदोलक त्या ठिकाणी मौजमजा करताना दिसत आहेत.
काही लोक राष्ट्रपतींच्या स्विमिंग पूलमध्ये डुबकी मारत आहेत, तर काही जण राष्ट्रपतींच्या खुर्चीवर बसून फोटो काढत असल्याचे फोटो व्हायरल झाले आहेत. काही लोक रॉयल किचनमध्ये जेवण करत आहेत, तर काही राष्ट्रपतींच्या बेडरूममध्ये आराम करत आहेत.
श्रीलंकेत ही परिस्थिती चालू असतानाच भारताने मात्र भारताने पुन्हा एकदा श्रीलंकेला मदतीचा हात पुढे केला आहे. भारताचे उच्चायुक्त गोपाल बागले यांनी सांगितले की,केंद्र सरकारने श्रीलंकेला मदत करण्यासाठी 44 हजार मेट्रिक टन युरिया पाठवण्यात आला आहे. त्यांनी सोशल मीडियावर याचा फोटो शेअर करण्यात आला आहे.
श्रीलंकेतील संकटाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनीही चिंता व्यक्त केली आहे. सोनिया गांधी यांनी सांगितले आहे की, प्रचंड महागाई आणि जीवनावश्यक वस्तूंचा अभाव त्यामुळे श्रीलंकेत मोठे संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे आम्हाला आशा आहे की भारत सरकार श्रीलंकेला मदत करत राहील. काँग्रेस पक्षही या संकटकाळात श्रीलंकेतील जनतेच्या पाठीशी उभा असल्याचे त्यांनी पत्रात म्हटले आहे.
भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी सांगितले की, भारत सरकारकडून श्रीलंकेला नेहमीच पाठिंबा देण्यात येत आहे. अलीकडच्या काळात जे संकट आले आहे त्यातही सर्वतोपरी मदत केली जात आहे. श्रीलंकेच्या बाजूने सध्या भारतात निर्वासितांचे कोणतेही संकट नसल्याचे भारतीय परराष्ट्रमंत्र्यांनी स्पष्ट केले.
श्रीलंकेतील राजकीय परिस्थिती भयानकतेच्या पार गेली आहे. नागरिकांनी रागाच्या भरात पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांच्या मालकीच्या घराला आग लावली आहे. त्यामुळे याप्रकरमी तिघांना पोलिसांनी अटक केली आहे तर दुसरकीकडे आंदोलनकर्त्यांनी राष्ट्रपती निवासस्थानातून बाहेर पडण्यास नकार दिला आहे.