अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर गेल्या तीन महिन्यापासून अंतराळात अडकले आहेत. आठ दिवसाच्या मिशनवर गेल्यानंतर आता त्यांना वर्षभर अंतराळात राहावं लागणार आहे. या दोघांना अंतराळातून पृथ्वीवर आणण्यासाठी तेवढा वेळ लागणार आहे. मधल्या काळात सुनीताने अंतराळातून पृथ्वीवरील लोकांशी संवाद साधला होता. पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली होती. आता सुनीताने आणखी एक मनातील रहस्य उलगडलं आहे. तिला अंतराळात कुणाची सर्वाधिक आठवण येतेय, याची माहितीच तिने दिली आहे.
सुनीता विल्यम्स अंतराळात आहे. तिला अंतराळात तिच्या दोन श्वानांची, कुटुंबियांची आणि मित्रांची प्रचंड आठवण येत आहे. मी या सर्वांना मिस करत आहे, असं सुनीताने म्हटलं आहे. माझ्या मित्र आणि कुटुंबीयांना माझ्यापासून दूर राहणं कठिण आहे, पण ते समजदार आहेत. स्पेसएक्स क्रू-9 परत यावा हे प्रत्येकाला वाटतंय, असं सुनीताने सांगितलं.
मॉर्निंग वॉक आणि पक्ष्यांचा किलबिलाट
सुनीता आणि विल्मोर हे स्पेसएक्स क्रूद्वारे फेब्रुवारी 2025मध्ये पृथ्वीवर येणार आहे. पृथ्वीवर चालताना किंवा फिरताना डोक्यात असंख्य विचार असतात. पण तरीही पृथ्वीवर राहणं सर्वात चांगलं आहे. मला माझ्या डॉग्सना मॉर्निंग वॉकला घेऊन जाणं आणि सकाळी सकाळी पक्ष्यांचा किलबिलाट ऐकणं आवडतं. या अॅक्टिव्हिटिज मी प्रचंड मिस करत आहे, असं सुनीताने स्पष्ट केलं.
इथली दुनियाच वेगळी
ज्यांच्यावर लक्ष केंद्रीत केलं पाहिजे अशा अनेक गोष्टी आहेत. पण स्पेस स्टेशनवर एक काम करणं अत्यंत महत्त्वाचं आहे, ती म्हणजे जर्नलिंग. हे माझं इथलं आवडतं काम आहे. आठवड्याभरात रिकॅप लिहिणे आणि पृथ्वीवर पाठवायचं आहे. कारण हे काम किती मजेशीर आणि युनिक आहे हे लोकांना कळलं पाहिजे. पृथ्वीवरील जीवनाच्या तुलनेत इथली दुनिया वेगळी आहे. इथे नवीन गोष्टींचा विचार करताना तुमचा मेंदू वेगाने काम करतो, असंही तिने सांगितलं.
विल्मोर कुणासाठी भावूक?
तर, मी माझ्या मुलांचं आयुष्य आणि त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा मिस करतोय, असं बुच विल्मोरने सांगितलं. विल्मोरची छोटी मुलगी हायस्कूलच्या शेवटच्या वर्षाला आहे. मोठी मुलगी कॉलेजमध्ये दुसऱ्या वर्षाला आहे. त्यामुळे विल्मोर यांनाही आपल्या मुलांची आठवण सतावत आहे.