अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बूच विल्मोर हे दोघेही अंतराळात अडकले आहेत. दोन महिन्यांपेक्षा अधिक काळापासून ते अंतराळात आहेत. आठ दिवसाच्या मिशनसाठी दोघेही गेले होते. पण परिस्थिती बदलली आणि दोघांचाही मुक्काम वाढला. सुनीता आणि विल्मोरला ज्या स्टारलाइनरने अंतराळात नेलं होतं, ते खराब झाल्याने ही परिस्थिती आली. विशेष म्हणजे स्टारलाइनर खराब झाल्यानंतरही पृथ्वीवर सुरक्षित आलं आहे. त्यानंतर आता नासाने एक आश्चर्यकारक विधान केलं आहे. त्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.
मॅक्सिकोत स्टारलाइनरला लँड केल्यानंतर नासाने एक पत्रकार परिषद घेतली होती. त्यात या मिशनशी संबंधित प्रश्नांची उत्तरे देण्यता आली होती. नासाच्या कमर्शिअल क्रू प्रोग्रामचे मॅनेजर स्टिव्ह स्टिच यांनी पत्रकार परिषदेला संबोधित करताना काही गोष्टी मान्य केल्या होत्या. जर स्टारलाइनर कॅप्सूलमध्ये सुनीता आणि विल्मोर बसले असते तर तेही सुरक्षितपणे पृथ्वीवर आले असते, असं स्टिव्ह यांनी म्हटलं आहे. जर आमच्या स्पेसक्राफ्टवर क्रू असता, तरीही आम्ही या प्रक्रियेचं पालन केलं असतं. स्पेस स्टेशनमधून बाहेर पडणं, डी-ऑर्बिट बर्न होणं आणि त्याच पद्धतीने पृथ्वीवर एन्ट्री घ्यावी लागते. त्यामुळे क्रूची यशस्वी आणि सुरक्षित लँडिंग होते. जर सुनीता आणि विल्मोर स्पेसक्राफ्टमध्ये असते तर सर्व काही सहज झालं असतं, असं स्टिव्ह यांनी स्पष्ट केलं.
निर्णय योग्यच होता
बोइंगचं स्टारलाइनर स्पेसक्राफ्ट जूनमध्ये स्पेस स्टेशनवर आठवड्याभरासाठी गेलं होतं. पण त्यातील हिलियम लीक आणि थ्रस्टरमध्ये झालेल्या तांत्रिक अडचणीमुळे स्टारलाइनर अंतराळात अडकलं. त्यामुळे सुनीता आणि विल्मोरची अंतराळातून वापसी थांबवण्यात आली होती. मात्र, या सर्व प्रकरणावर स्टिव्ह स्टिच यांनी एक गोष्ट ही सुद्धा कबूल केलीय की, सुनीता आणि विल्मोरला स्टारलाइनरमधून परत न आणण्याचा घेतलेला निर्णय योग्यच होता. निर्णय घेणं माझ्यासाठी आणि टीमसाठी अत्यंत अडचणीचं होतं. पण जेव्हा आम्ही स्टारलाइनरला यशस्वीपणे लँडिंग करताना पाहिलं, तेव्हा सुनीता आणि विल्यम्सही सुखरूप आले असते असं मनात आलं होतं. पण स्टारलाइनरची लँडिंग ही एक टेस्ट फ्लाईट होती. त्यात रिस्क घेता येत नव्हती, असंही स्टिव्ह म्हणाले. आम्हाला थ्रस्टरच्या परफॉर्मन्सवर पूर्ण विश्वास नव्हता. त्यामुळेच कोणत्याही क्रू शिवाय स्पेसक्राफ्ट लँडिंग करण्याचा आम्ही निर्णय घेतला होता, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
8 महिने मुक्काम वाढणार
दरम्यान, सुनीता आणि विल्मोर यांचा अंतराळातील मुक्काम आठ महिन्यांनी वाढणार आहे. स्पेस स्टेशनवर सतत मेंटेनन्स आणि रिसर्चचं काम सुरू राहतं. त्यामुळेच नासा ठरावीक अंतराने अंतराळात आपल्या संशोधकांना पाठवत असते. रोटेशन पद्धतीने या संशोधकांना पाठवलं जातं. सध्या स्पेस स्टेशनवर एक्सपेडिशन-71 चे क्रू काम करत आहेत. त्यात सुनीता आणि विल्मोर सहभागी आहेत. आता ते फूल टाईम क्रू मेंबर बनले आहेत.