नवी दिल्ली : तालिबान (Taliban) शासित आफगाणिस्तानची (Afghanistan) परिस्थिती वेगळी सांगायला नको. तिथल्या दररोजच्या नवनवीन फतव्याच्या बातम्या येऊन धडकतात. त्यांच्या बुरसटलेल्या मानसिकतेवर जगभरातून टीका होते. तालिबान आल्यामुळे महिलांच्या आणि लहान मुलांच्या स्वातंत्र्यावर गदा आल्याचे त्यांच्या निर्णयावरुन स्पष्ट होते. तालिबानने महिलांच्या विश्वविद्यालयातील शिक्षणावर बंदी घातली आहे. पण आता याच तालिबान्यांच्या युगात एक सुपर कार तयार केल्याच्या दाव्याने सोशल मीडियावर (Social Media) खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या सुपर कारचे (Super Car) फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यामुळे जग काही सेकंद अवाक झाले.
तालिबानच्या काही अभियंत्यांनी एक खास कार तयार केली आहे. तिला माडा 9 (Super Car Mada 9) असे नाव देण्यात आले आहे. ही कार तयार करण्यास तालिबानला 5 वर्षे लागले. तालिबानचे उच्च शिक्षा मंत्री अब्दुल बाकी हक्कानी यांनी ही सुपर कार सादर केली.
हक्कानी आणि इतर साथीदारांनी या कारसोबताच फोटो आणि व्हिडिओ ही सोशल मीडियावर शेअर केला. दाव्यानुसार, काही अभियंत्यांनी ही कार तयार केली. ENTOP नावाच्या कंपनीने ही कार तयार केली आहे.
सध्या हे सुपर कारचे कॉन्स्पेट मॉडेल आहे. काबुल येथील अफगाणिस्तान तांत्रिक व्यावसायिक संस्थानचे (ATVI) कमीत कमी 30 अभियंते आणि ENTOP यांच्या संयुक्त उपक्रमातून ही सुपर कार तयार करण्यात आली. या माडा 9 कारमध्ये टोयाटा कोरोला इजिनचा वापर करण्यात आला आहे.
या सुपरकारसाठी अभियंत्यांनी इंजिनमध्ये थोडा बदल केला आहे. अहवालानुसार, कारमधील इंटेरिअरचे काम अजून बाकी आहे. या प्रकल्पावर आतापर्यंत तालिबानने 40 ते 50 हजार डॉलर खर्च केले आहेत. दाव्यानुसार, अभियंत्यांनी या कारची टेस्टिंग पण केली आहे.
सुपरकार चालविल्याचा दावा करण्यात आला असला तरी, यासंबंधीचा एकही व्हिडिओ तालिबानने शेअर केला नाही. जे व्हिडिओ शेअर करण्यात आले आहेत. त्यात ही कार केवळ उभी असल्याचे दिसत आहे. तालिबानी नेते आणि अभियंते यांच्यासह कारचे फोटो ही व्हायरल झाले आहेत.
ही कार बाहेरुन अत्यंत स्पोर्टी दिसत आहे. अर्थात तालिबानच्या या दाव्यावर अनेक युझर्संनी त्यांची गंमत घेतली आहे. काहींनी त्यांच्या धोरणांची आणि निर्णयाची खिल्ली उडवली आहे. तर काही वापरकर्त्यांनी या कारवर रॉकेट लॉन्चरसाठी काय व्यवस्था केली. ते कुठे लावणार असा सवाल विचारुन तालिबानला चिमटा काढला आहे.