नवी दिल्ली | 12 ऑक्टोबर 2023 : हमासने इस्त्राईलवर अचानक हल्ला केला. त्याचे पडसाद तात्काळ उमटले. इस्त्राईलने जोरदार प्रत्त्युतर दिले. गाझा पट्टीत क्षेपणास्त्रांचा मारा सुरुच आहे. त्यामुळे या भागातील अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत. या भागाची इस्त्राईलने संपूर्ण नाकाबंदी केली आहे. पाणी-वीज सर्वच बंद करण्यात आले आहे. नागरिकांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. पण या युद्धामुळे रशिया मात्र खूश झाला आहे. त्याला या युद्धाचा फायदा होणार आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतिन यांच्या मनात लाडू फुटत आहेत. कारण तरी काय?
युक्रेनची चिवट झुंज
रशियाने युक्रेनविरोधात जोरदार हल्ला चढवला होता. त्याला 19 महिने उलटून गेली आहे. अवघ्या एका महिन्यात रशिया युक्रेन गिळंकृत करेल असे रशियालाच नाही तर जगाला वाटत होते. अनेक शहरं बेचिराख होऊनही युक्रेनच्या जनतेने स्वातंत्र्याचा चिवट लढा सुरुच ठेवला आहे. रशियातील जनता आणि अनेक सैनिक सुद्धा युद्धाच्या विरोधात असल्याने पुतिन यांना ही लढाई जिंकणे अवघड जात आहे.
अमेरिकेची रसद
रशिया-युक्रेन युद्धात नाटो, दोस्त राष्ट्रांनी, अमेरिकेने युक्रेनचा पक्ष उचलून धरला आहे. आधुनिक शस्र, रणगाडे, आर्थिक रसद युक्रेनला पुरविण्यात येत आहे. नाटोत सहभागी होण्याचा युक्रेनचा हट्ट पुतिन यांना आवडला नव्हता. हा थेट रशियाच्या सार्वभौमत्वावर पहारा असल्याचे सांगत त्यांनी युक्रेनवर हल्ला चढवला होता. पण दोस्त राष्ट्रांच्या रसदमुळे पुतिन यांच्या मनसुब्यावर पाणी फेरले गेले.
इस्त्राईल-हमास युद्धाचा फायदा
इस्त्राईल-हमास युद्ध हे मध्य-पूर्वेतील भूराजकीय दृष्टीने महत्वाचे प्रकरण आहे. दोस्त राष्ट्रांना या भागातून जगभरात लक्ष ठेवता येते. अरब राष्ट्रातील कच्चा इंधनावर नियंत्रण ठेवता येते. चीन आणि रशिया येथून टप्प्यात येतो. इस्त्राईल त्यासाठी महत्वाचा आहे. अमेरिकेसह युरोपियन राष्ट्रांनी इस्त्राईलला पाठिंबा जाहीर केला आहे. आर्थिक मदतीसह, अत्याधुनिक शस्त्रांचा पुरवठा केला आहे. अमेरिकचे लक्ष विचलित झाल्याने त्याचा फायदा रशियाला होऊ शकतो. युक्रेनविरोधातील लांबलेली लढाई रशियाला लवकर पूर्ण करता येऊ शकते. युक्रेनचा लवकरच पाडाव करता येऊ शकतो.