तेल अवीव | 12 ऑक्टोबर 2023 : हमासने शनिवारी केलेल्या भयंकर हल्ल्यानंतर चवताळलेल्या इस्रायलने गाझापट्टी बेचिराख करण्याचा जणू विडाच उचलला आहे. इस्रायलने गाझापट्टी संपूर्ण घेराबंदी केली असून प्रवेशासाठी प्रतिबंध घातला आहे. बुधवारी इस्रायली सैनिकांनी जोरदार बॉम्बवर्षाव केला असून गाझा पट्टीची वीज आणि पाणी बंद करुन टाकले आहे. इस्रायलच्या पंतप्रधानांनी बुधवारी परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी वॉर कॅबिनेट तयार केली आहे. भारतासह पश्चिम देशांनी इस्रायलला पाठींबा दिला असला तरी आता मुस्लीम देश पॅलेस्टिनींच्या बाजूने एकत्र आले आहेत.
अरब देशांनी बुधवारी इस्रायल आणि हमास युद्धाच्या पार्श्वभूमीवर एक आपात्कालिन बैठक बोलाविली आहे. या बैठकीत गाझावर इस्रायलने केलेल्या संपूर्ण नाकाबंदी अन्यायकारक ठरविण्यात आले आहे. इस्रायलने चार बाजूंनी गाझापट्टीची कोंडी केली आहे. इस्रायलने गाझात जेवण, इंधन आणि औषधांच्या पुरवठ्यावर बंदी घातली आहे. बुधवारपासून गाझाचा वीजपुरवठा देखील बंद करण्यात आला आहे.
मुस्लीम देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांची एक आपत्कालीन बैठक पार पडली आहे. या बैठकीत गाझात लवकरात लवकर मुलभूत सेवा बहाल करण्यावर याबैठकीत एकमत झाले. बैठकीत इस्रायलने आपल्या आंतरराष्ट्रीय कर्तव्याचे पालन करावे आणि वीज,पाणी आणि आरोग्य सेवा बहाल करण्यात असा ठराव या बैठकीत झाला. अरब लीगच्या महासचिवांनी या बैठकीत सांगितले की,’ आम्ही दोन्ही पक्षांच्या नागरिकांसाठी हिंसेच्या विरोधात आहोत. नागरिकांना मारुन स्वातंत्र्य मिळविणे योग्य नाही.’ वर्तमानात ज्या घटना घडत आहे आजच्यामुळे नाहीत. पॅलेस्टिनींना त्यांचे योग्य अधिकार न मिळाल्याने त्या घडल्या असल्याचे त्यांनी सांगितले. ‘अरब लीग’ मध्ये 22 मुस्लीम देशांचा समावेश आहे.
हमासला बदल हवा होता आणि त्याला बदल पाहायला मिळेल. गाझात जे होते ते आता उरणार नाही. आम्ही हवाई हल्ल्याने आक्रमणाला सुरुवात केली आता जमीनीवरुन युद्ध सुरु होईल. आम्ही मानवाच्या रुपातील पशुंबरोबर लढत आहोत असे इस्रायलचे संरक्षण मंत्री योव गॅलेंट यांनी म्हटले आहे. इस्रायल डीफेन्स फोर्सचे प्रवक्ता लेफ्टनंट कर्नल जोनाथन कोनरिकस यांनी सांगितले की गाझा सीमेवर सुमारे तीन लाख सैनिक तैनात केले आहेत. हमास जवळ कोणतीही सैनिकी ताकद शिल्लक राहणार नाही अशा पद्धतीने ते युद्धाचा शेवट करतील.