नवी दिल्ली | 22 सप्टेंबर 2023 : ‘जिनके घर शीशे के होते हैं वे दूसरों के घरों पर पत्थर नहीं फेंकते’ हा डायलॉग कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रूडो (PM Justin Trudeau) यांना माहिती नसावा. स्वतःचे घर जळत असताना ती आग विझायचे सोडून ट्रूडो खलिस्तानी चळवळीला खतपाणी घालत आहे. कॅनडाला जागतिक समुदायाकडूनच आता टोमणे सहन करावे लागत आहे. पाकिस्तान, चीन खलिस्तान चळवळीला फंडिंग आणि शस्त्र पुरवठा करत असल्याचे अनेकदा उघड झाले आहे. खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जर याची हत्या भारतानेच घडविल्याची ठोस कारणं हाती लागल्याचा दावा ट्रूडो यांनी केला. शीख समुदायाची मतं पदरात पाडण्यासाठी त्यांचा खटाटोप सुरु आहे. क्युबेक स्वातंत्र्य चळवळ (Quebec Independence Movement) पण आता चर्चिल्या जात आहे, काय आहे ही स्वातंत्र्य चळवळ?
ट्रूडो कुटुंबचा उघड पाठिंबा
कॅनडाने खलिस्तानी दहशतवाद्यांना पूर्वीपासूनच आश्रय दिला आहे. जस्टीन ट्रूडो यांचे वडील व माजी पंतप्रधान पियरे ट्रूडो यांनी बब्बर खालसाचा मुख्य दहशतवादी तलविंदर सिंह परमार याला आश्रय दिला होता. या परमारच एअर इंडियाच्या विमान हल्ल्याचा मुख्य सूत्रधार होता. या हल्ल्यात 329 प्रवाशांना जीव गमवावा लागला होता. 23 जून 1985 रोजी हा हल्ला झाला होता.
काय आहे इतिहास
कॅनडावर अगोदर फ्रान्सचा ताबा होता. 1530 सालपासून हा गुलामीचे सत्र सुरु झाले. पुढे 150 वर्षे कॅनडा हा फ्रान्सचा भाग म्हणून राहिला. ही फ्रान्सची वसाहत होती. 1760 मध्ये इंग्रजांनी युद्ध सुरु केले. त्यात अनेक भारतीयांचा पण समावेश होता. त्यात फ्रान्सचा पराभव झाला. कॅनडाच्या वरील भागात इंग्रजांचे तर दक्षिण भागात फ्रान्सचे अधिपत्य होते. सध्याचे क्युबेक शहर दक्षिण भागात आहे. 1867 मध्ये ब्रिटिश उत्तर अमेरिका अधिनियमानुसार हे दोन भाग एकत्र आले.
क्युबेक स्वातंत्र्य चळवळ
तर दक्षिणेतील क्युबेक शहरात स्वातंत्र्याची चळवळ फार पूर्वीपासून सुरु आहे. हा भाग स्वतंत्र देशाची मागणी करत आहे. त्यासाठी जनमत चाचणी घेण्याची दक्षिणेतील फ्रेंच लोकांची मागणी आहे. कॅनाडा सरकार ही मागणी फेटाळत आहे. क्युबेक भागात औद्योगिक क्रांती सर्वात अगोदर आली. हा भाग झटपट विकासाच्या मार्गाने समोर आला. 1966 पासून या चळवळीने जोर धरला आहे. 1974 आणि 1976 मध्ये येथील स्थानिक सरकारने अधिकृत भाषा म्हणून फ्रेंचला मंजूरी दिली. 1995 साली झालेल्या जनमत चाचणीत अत्यंत कमी फरकाने क्युबेक स्वतंत्र चळवळ दाबल्या गेली. पण अजूनही स्वातंत्र्यासाठी येथे मोर्चा, आंदोलने सुरुच असतात.