रशियाकडून मॉस्कोमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांच्या पुतळ्याचे अनावरण देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. रशियाकडून तिसऱ्या भारतीय व्यक्तीचा पुतळ्याचे अनावरण केल्याप्रकरणी भारतीय संस्कृती जपल्याचा आम्हाला गर्व असल्याचे मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. त्यामुळे आजचा हा दिवस आमच्यासाठी ऐतिहासिक असल्याचेही त्यांनी याप्रसंगी सांगितले. महाराष्ट्र आणि भारतातील दलित, वंचित वर्गातील व्यक्तीचा रशियासारख्या राष्ट्राकडून गौरव होत असल्याने ही निश्चितच आमच्यासाठी गौरवाची बाब असल्याचेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. फकिरासारख्या कादंबरीने साहित्यात वेगळी छाप उमटवली आहे. अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातून दलित, मजूरांची , पीडितांची एक वेगळी बाजू मांडण्याचा प्रयत्न अण्णाभाऊ साठेंनी केला आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे अनावरण माझ्या हस्ते करण्याची संधी दिल्याबद्दल मी आभार मानतो अशी भावनाही देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.