नवी दिल्ली : अख्या जगाला पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील तालिबानी (Taliban) यांची दोस्ती माहित आहे. जेव्हा जेव्हा पाकिस्तानला तालिबानची आणि तालिबानला पाकिस्तानची (Pakistan) गरज भासली त्या त्या वेळी एकमेकांना दोघांनी मदत केली आहे. तर यामुळे हे दोन्ही देश एकमेकांचे भाऊ असल्याचेच जगाला वाटायचे. तर गेल्याच वर्षी अफगाणिस्तानात तालिबानला सत्तेवर आणण्यात पाकिस्तानने महत्त्वाची भूमिका बजावली होती. मात्र आता या दोन भावांच्या नात्यात फुट पडल्याचे दिसत आहे. तर आता पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या संबंधात दुरावा निर्माण झाल्याचे समोर येत आहे. तालिबानने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत (UNSC) पाकिस्तानविरोधात तक्रार दाखल केली आहे. पाकिस्तानच्या लष्कराने आमच्या खोस्त आणि कुनार प्रांतात हवाई हल्ले केल्याचा आरोप तालिबानने केला आहे. तसेच यावेळी आम्ही गप्प बसणार नाही असे म्हणत तालिबानने पाकिस्तान सरकारला कडक सल्लाही दिला आहे.
दरम्यान दोन वर्षांपूर्वीपर्यंत तालिबान पाकिस्तानच्या इशाऱ्यावर नाचायचे. अफगाणिस्तानची सत्ता काबीज केल्यानंतर पाकिस्तानने आपले बोट धरून जागतिक बंधुत्वाशी जोडण्याचा प्रयत्न केला होता, मात्र आता दोन्ही देशांमधील कटुता वाढत आहे. अफगाणिस्तानातील तालिबान सरकारच्या वतीने नासिर अहमद फैक यांनी पाकिस्तानविरोधात यूएनएससीकडे तक्रार केली आहे. फैकच्या तक्रारीला तालिबान, हक्कानी नेटवर्क आणि तहरीक-ए-तालिबान पाकिस्ताननेही पाठिंबा दिला आहे. पाकिस्तानी लष्कराने केलेल्या हवाई हल्ल्यात 40 जण ठार झाल्याचे तालिबानचे म्हणणे आहे. यामध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश असल्याचा त्यांनी म्हटले आहे.
UNSC च्या अध्यक्षांना लिहिलेल्या पत्रात फैक म्हणाले की, पाकिस्तानचा हवाई हल्ला हा आंतरराष्ट्रीय कायद्याचे स्पष्ट उल्लंघन आहे. अनेक घरांचेही नुकसान झाले आहे. तालिबान, हक्कानी नेटवर्क आणि तहरीक-ए-तालिबान या सर्व पश्तून-संलग्न संघटना आहेत. ते पाकिस्तानकडून ड्युरंड सीमा रेषेला घेरण्याच्या विरोधात आहेत. या माध्यमातून पाकिस्तान पश्तूनांना वेगळे करण्याचे काम करत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
विशेषत: पाकिस्तानातील खैबर पख्तुनख्वा प्रांतात मोठी लोकसंख्या पश्तूनांची आहे. अफगाणिस्तान हा देखील पश्तून बहुसंख्य देश आहे. अफगाणिस्तानने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, पाकिस्तानच्या लष्कराने जे काही केले ते आंतरराष्ट्रीय कायदा, मानवाधिकार आणि यूएन चार्टरच्या तत्त्वांचे उल्लंघन आहे. याशिवाय संयुक्त राष्ट्र महासभा आणि सुरक्षा परिषदेच्या ठरावांचेही उल्लंघन केले आहे. अफगाणिस्तानच्या तालिबान सरकारने सुरक्षा परिषदेच्या माध्यमातून पाकिस्तान सरकारला इशारा दिला आहे की, अशा हल्ल्यांमुळे दोन्ही देशांमधील संबंध बिघडतील. या भागातील शांतता आणि सुव्यवस्थेवरही याचा परिणाम होणार आहे.