नवी दिल्ली | 13 ऑक्टोबर 2023 : हमासने इस्रायलवर केलेल्या धाडसी हल्ल्याची किंमत संपूर्ण गाझापट्टीला चुकवावी लागत आहे. शाळा, कॉलेज, युनिव्हर्सिटी, मुख्यबाजार असो कि रुग्णालय सर्वत्र प्रेतांचे ढीग आहेत. दर मिनिटांना बॉम्ब आणि मिसाईल येऊन पडत आहेत. त्यामुळे वाचलेले लोक आता त्यांच्या जीव कसा वाचवायच्या चिंतेत आहेत. त्यामुळे येथील लोक स्वत:ला वाचविण्यासाठी आता हमासने खणलेल्या भुयारांचा शेल्टर म्हणून वापर करीत आहेत. आपल्या कारवायांसाठी हमासने खणलेली ही भुयारे अतिरेकी आणि नागरिक दोघांची लाईफलाईन बनली आहेत.
गाझापट्टीच्या खाली आणखी एक गाझा वसले आहे. ज्याची निर्मिती हमासने आपल्या कारवायासाठी केली होती. या भुयारी मार्गांचा वापर अतिरेक्यांना संरक्षण देणे आणि सामान्य लोकांना रसद तसेच मुलभूत सेवा पुरविणे यासाठी केला जात असतो. असे म्हटले जाते एक आणखी भुयारांचे नेटवर्क इजिप्तमध्येही आहे. इस्रायलच्या सातत्याच्या घेराबंदीतून मार्ग काढण्यासाठी सर्वात कठीण काळात या क्षेत्रात अन्न, कपडे आणि खेळणी एवढेच काय ? कार आणण्यासाठी कमर्शियल भुयारे खणण्यात आली होती.यांचा वापर अनेक वर्षांपासून झालेला नाही. परंतू इस्रायलने जर सीमेवर पुन्हा संपूर्ण नाकेबंदी केली तर या भुयारांचा पुन्हा वापर होऊ शकतो.
गाझावर हमासचे नियंत्रण येण्यापूर्वी पॅलेस्टिनींना गाझा सोडणे आणि अन्य पॅलेस्टिनी क्षेत्र, वेस्ट बॅंकचा दौरा करण्यासाठी इस्रायलचे परमिट मिळविणे जवळपास अशक्य झाले होते. 2007 मध्ये हमासने गाझावर कब्जा केल्यानंतर गाझावर इस्रायलची नाकाबंदी लागली. त्यानंतर गाझावासीय जीवंत राहण्यापूरता अन्नपुरवठा इस्रायलने सुरु ठेवला होता. तेथीस सर्व व्यवसाय बंद पडले. इस्रायल आणि वेस्ट बॅंकबरोबरचा गाझाची निर्यात व्यापार बंद झाला. त्यामुळे प्रचंड गरीबी वाढली. त्यामुळे गाझाच्या लोकांनी इजिप्त बरोबर भुयारी व्यापार आणि तस्करी सुरु केली. त्यानंतर इजिप्तच्या सीमेवरही शेकडो भुयारे खणली गेली. यात वस्तूंसोबत मनुष्य तस्करीही झाली. हमासमुळे गाझावर संकट आले असताना आता ही भुयारे त्यांच्या जीवंत रहाण्याची एकमेव आशा उरली आहेत. गाझाचे भविष्य काय असले कोणालाच माहीती नाही. येणाऱ्या काळात जग येथे अकल्पित घटना पाहू शकते. एखाद्या देशाची अतिरेक्यांमुळे झालेली अवस्था पाहू याहून वाईट काय होणार ?