नवी दिल्ली | 22 ऑक्टोबर 2023 : इस्रायलवर हमासने हल्ला ( israel hamas war ) केल्यानंतर इस्रायलने गाझा पट्टीत बॉम्बहल्ले करुन युद्ध सुरु केले आहे. या हमासला या प्रकरणात इराणकडून मदत मिळाल्याचा अमेरिकेला संशय आहे. त्यामुळे इराणचे वाढते प्रस्थ पाहून अमेरिकेने पश्चिम आशियात अतिरिक्त एअर डिफेन्स सिस्टीम पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिका पश्चिम आशियात टर्मिनल हाय एल्टीट्यूड एरिया डिफेन्स ( थाड ) सिस्टीम आणि पॅट्रीयट बटालियन पाठणार असल्याचे अमेरिकेचे संरक्षण मंत्री लॉयड ऑस्टीन यांनी म्हटले आहे.
पश्चिम आशियात तणाव वाढत चालला आहे. अशावेळी अमेरिकेने मोठा धाडसी निर्णय घेतला आहे. या वाढत्या तणाव आणि हिंसेत इस्रायलला मदत करण्याची भूमिका असल्याचे अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉयड ऑस्टीन यांनी म्हटले आहे. ते पुढे म्हणाले की राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्याशी इराणच्या या क्षेत्रातील वाढत्या हालचाली आणि युद्धास अप्रत्यक्ष भडकवण्याचे प्रयत्नाच्या पार्श्वभूमीवर विस्ताराने चर्चा झाली. त्यानंतर या क्षेत्रात अतिरिक्त शस्रे तैनात करणे आणि सैनिकांची संख्या वाढविण्याचा आदेश त्यांनी दिला. मध्य पूर्वेत ( पश्चिम आशिया ) इराण समर्थित संघटनांच्या तणाव वाढविण्याच्या प्रयत्नांनी अमेरिका सावध झाली आहे. यापूर्वी अमेरिकेने भूमध्य समुद्रात आपल्या विमानवाहू नौका तैनात केल्या आहेत.
अमेरिकेने पश्चिम आशियात पॅट्रीयट बटालियन तैनात करण्याचाही निर्णय घेतला आहे. ही अत्याधुनिक एअर डिफेन्स यंत्रणा आहे. तर थाड सिस्टीम कमी आणि मध्यम पल्ल्याच्या बॅलेस्टीक मिसाईलला रोखण्याचे काम करते. इराक आणि सिरीयात अमेरिकेचे सैन्य तैनात आहे. 7 ऑक्टोबरपासून इस्रायल आणि हमास युद्ध सुरु आहे. तेव्हापासून इराक आणि सिरीयातील अमेरिकन सैन्यांवर ड्रोन हल्ले होत आहेत. अमेरिकेने आता येथे अतिरिक्त सैन्य पाठविण्याचा निर्णय घेतला आहे.
हमासने 7 ऑक्टोबर रोजी इस्रायलवर हल्ला करून 1400 नागरिकांची हत्या केली आहे. त्यानंतर इस्रायलने गाझावर हल्ला करुन उत्तर दिले आहे. या युद्धात आतापर्यंत गाझापट्टीत 4,469 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर हजाराहून अधिक लोक जखमी झाले आहेत.