नवी दिल्ली : ‘सिगारेट आरोग्यासाठी हानीकारक आहे’, जगभरातील सिगारेटच्या पाकिटावर हा वैधानिक इशारा (Cigarette Warning) तुम्हाला हमखास दिसून येतो. प्रत्येक सरकार सिगारेटवर भारीभक्कम कर आकारुन भरमसाठ महसूल जमा करते. सिगारेटची किंमत सर्वाधिक असूनही त्याच्या विक्रीत कमी आलेली नाही. अशावेळी सिगारेटची सवय सोडविण्यासाठी आणि तिचा धोका अधोरेखित करण्यासाठी या देशाने आणखी पुढचं पाऊल टाकलं आहे. प्रत्येक सिगारेटवर धोक्याचा इशारा लिहिण्याचे आदेश तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांचं उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना देण्यात आले आहेत.
या देशाचा मोठा निर्णय
पाकिटावरच नाही तर धोक्याचा इशारा प्रत्येक सिगारेटवर लिहिण्याची सक्त ताकदी कॅनडा सरकारने दिली आहे. तंबाखू उत्पादक कंपन्यांना आता यापुढे सर्व प्रकारच्या सिगारेटवर व उत्पादनांवर हा धोक्याचा इशारा ठळकपणे लिहावा लागणार आहे. असा मोठा निर्णय घेणारा कॅनाडा हा जगातील पहिला देश ठरला आहे.
प्रत्येक झुरका विषच
सिगारेट लहान मुलांच्या, गर्भवती, वृद्धांच्या आरोग्यासाठी सर्वात घातक ठरते. सिगारेटमुळे ल्यूकेमिया होतो. सिगारेटचा प्रत्येक झुरका विषापेक्षा कमी नाही, असा संदेश प्रत्येक सिगारेटवर दिसून येईल. त्यामुळे झुरका घेताना तरी सिगारेट पिणाऱ्याला त्याची चूक उमगेल, असे कॅनाडा सरकारला वाटते. हा वैधानिक इशारा फ्रेंच आणि इंग्रजी भाषेत असेल. कॅनडा सरकारने बुधवारी याविषयीची घोषणा केला. प्रत्येक सिगारेट कंपनीला हा इशारा लिहिणे अनिवार्य करण्यात आले आहे.
ऑगस्टपासून नियम लागू
कॅनडाच्या आरोग्य अधिकाऱ्याने यामागील कारण स्पष्ट केले. देशातील वयस्कांना यामुळे सिगारेट सोडविण्यास मदत होईल. त्यांच्यावर मनोवैज्ञानिक परिणाम दिसेल. स्वतः ही कृती करण्यापासून ते परावृत्त होतील. देशातील तरुण निकोटीनच्या आहारी जाणार नाहीत, असे आरोग्य अधिकाऱ्यांना वाटते. कॅनाडा 2023 पर्यंत तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांचा वापर 5 टक्के कमी करणार आहे. त्यासाठीचे उद्दिष्ट निर्धारीत करण्यात आले आहे. हा नवीन नियम 1 ऑगस्टपासून लागू होईल. प्रत्येक सिगारेटवर आता धोक्याचा इशारा लिहिण्यात येईल.
भारत पण नाही मागे
भारतातील अनेक उत्पादनांमध्ये इशारा देण्याचा नियम तयार करण्यात आला आहे. अशी सर्व उत्पादने ज्यांच्यामुळे ग्राहकाला कोणतेही नुकसान होऊ शकते, त्यांना चेतावणी दिली जाते. या चेतावणीचा उद्देश विशिष्ट उत्पादनाशी संबंधित जोखमींबद्दल माहिती प्रदान करणे आहे. कोणत्याही व्यक्तीला अनवधानाने या उत्पादनांचा त्रास होणार नाही याची काळजी घेतली गेली पाहिजे आणि उत्पादन खरेदी करताना, त्याला त्याचे नुकसान काय आहे ही आगाऊ माहिती द्यावी असे नियमात स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे आता तुमचा मृत्यू ओढावू शकतो, हे वाक्य वाचण्यासाठी तयार रहा.