पाकिस्तानात चाललयं तरी काय? अल्पसंख्यांक पुन्हा धोक्यात, 2 शीखांची हत्या

| Updated on: May 15, 2022 | 3:57 PM

गेल्या आठ महिन्यांत पेशावरमध्ये शीख समुदायावर झालेला हा दुसरा हल्ला आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये पेशावरमध्ये प्रसिद्ध शीख 'हकीम' यांची अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली होती.

पाकिस्तानात चाललयं तरी काय? अल्पसंख्यांक पुन्हा धोक्यात, 2 शीखांची हत्या
दोन शीख बांधवांची हत्या
Image Credit source: tv9
Follow us on

पेशावर : पाकिस्तानमध्ये अल्पसंख्यांकांवर हल्ल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. अल्पसंख्याकांवर (minority Sikhs) होणारे अत्याचार आणि असे हल्ले हे नवीन नाहीत. तर या वर्षात हा दुसरा हल्ला असून यावेळी पाकिस्तानमध्ये दोन शीख बांधवांची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या (shot dead) करण्यात आली आहे. पाकिस्तानातील पेशावरमध्ये ही घटना घडली. या घटनेच्या वेळी दोघेही बडा बाजार येथील त्यांच्या दुकानात बसले होते. तर ते पेशावरमध्ये (Peshawar) बरेच दिवस दुकान चालवत होते. मृतांमध्ये कुलजीत सिंग (वय 42) आणि रणजित सिंग (वय 38) यांचा समावेश आहे. दुचाकीवरून आलेल्या दोन नराधमांनी दुकानात अंदाधुंद गोळीबार करून त्यांची हत्या केली. अद्यापपर्यंत, मारेकऱ्याची ओळख पटलेली नाही. पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी रुग्णालयात पाठवले आहेत. तर मारेकऱ्यांच्या शोधासाठी पेशावरमध्ये पोलिसांची शोधमोहीम सुरू आहे. या घटनेनंतरचा संताप पाहता खैबर पख्तुनख्वा प्रांताचे मुख्यमंत्री महमूद खान यांनी पोलिसांना जाब विचारला आहे. तसेच ही घटना दुःखद असून मारेकऱ्यांना सोडले जाणार नाही, असेही खान यांनी म्हटले आहे.

सात महिन्यांपूर्वी खून

यापूर्वी पेशावरमध्येच सतनाम सिंग नावाच्या व्यक्तीची हत्या करण्यात आली होती. सात महिन्यांपूर्वी झालेल्या या हत्येबाबत कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. तर पोलिसांना आजपर्यंत मारेकऱ्यांचा शोधही लावता आलेला नाही.

सिरसा म्हणाले- पाक राजदूताला बोलवा

भाजप नेते मनजिंदर सिरसा म्हणाले की, पाकिस्तानातील शीखांना पेशावर सोडण्यासाठी धमकावले जात आहे. याबाबत पाकिस्तान सरकारला अनेकवेळा विचारणा करण्यात आली, मात्र ते कोणतेही पाऊल उचलत नाहीत. पाकिस्तानात शिखांची संख्या कमी आहे, त्यामुळे त्यांची कोण ऐकत नाही. यासंदर्भात आपले परराष्ट्र मंत्रालयाशी बोलणे सुरू असल्याचेही ते म्हणाले. भारत सरकारने पाकिस्तानमधील उच्चायुक्तांकडे संपर्क साधावा. यासंदर्भात पाकिस्तानच्या राजदूताला बोलावण्याची मागणीही त्यांनी केल्याचे सांगितले.

लक्ष्यावर अल्पसंख्याक

गेल्या आठ महिन्यांत पेशावरमध्ये शीख समुदायावर झालेला हा दुसरा हल्ला आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये पेशावरमध्ये प्रसिद्ध शीख ‘हकीम’ यांची अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. पेशावरमध्ये सुमारे 15,000 शीख राहतात. प्रांतीय राजधानीच्या शेजारच्या जोगन शाहमध्ये सर्वाधिक आहे. पेशावरमधील शीख समुदायातील बहुतेक सदस्य व्यवसायात गुंतलेले आहेत, तर काही फार्मसी देखील चालवतात.