लंडन, फरारी नीरव मोदीला (Nirav Modi) भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ब्रिटनच्या न्यायालयाने प्रत्यार्पण थांबवण्याची याचिका फेटाळून लावली आहे. याचिका फेटाळून लावताना ब्रिटीश उच्च न्यायालयाने म्हटले आहे की, नीरव मोदीचे प्रत्यार्पण कोणत्याही प्रकारे अन्यायकारक किंवा जाचक नाही.
फरारी नीरव मोदीला ब्रिटन कोर्टाने मोठा झटका दिला आहे. पंजाब नॅशनल बँक फसवणूक (PNB SCAM) प्रकरणी फरारी हिरे व्यापारी निरव मोदींची भारतातील प्रत्यार्पण थांबवण्याची मागणी ब्रिटनच्या न्यायालयाने बुधवारी फेटाळली. पंजाब नॅशनल बँकेच्या 13 हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील 51 वर्षीय नीरव मोदी हा मुख्य आरोपी आहे.
नीरव मोदीने ब्रिटन कोर्टात सांगितले होते की, त्याला भारतीय एजन्सीकडे सोपविण्यात येऊ नये, भारतातील तुरुंगांची स्थिती अत्यंत वाईट आहे. यासोबतच त्याने भारतात आपल्या जीवाला धोका असल्याचेही सांगितले होते, ज्याच्या प्रत्युत्तरात भारतीय एजन्सींनी बिट्रेनच्या न्यायालयाला सांगितले की, नीरव केवळ भारतात प्रत्यार्पण टाळण्यासाठी करणे देत आहे.
नीरव मोदी भारतातील मोठ्या हिरे व्यापाऱ्यांपैकी एक होता. त्याला भारतातील ‘डायमंड किंग’ असेही संबोधले जायचे. 2018 मध्ये नीरव मोदी फोब्र्ज या जगभरातील श्रीमंतांच्या यादीत 84 व्या स्थानावर होता. फोब्र्जच्या आकडेवारीनुसार नीरव मोदी याची जवळपास 12 हजार कोटींची संपत्ती आहे. नीरव मोदी याची फाईव्ह स्टार डायमंड नावाची कंपनी आहे.
‘नीरव मोदी डायमंड ब्रँड’ या नावाने भारतासह जगभरात ज्वेलरी शोरुम सुरु केले होते. दिल्ली, मुंबईपासून ते लंडन, हाँगकाँग आणि न्यूयॉर्कपर्यंत नीरव मोदींची 25 लक्झरी स्टोअर्स होते. बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा ‘नीरव मोदी डायमंड ब्रँड’ची ब्रँड अॅम्बेसेडर होती. केट विंसलेट आणि डकोटा जॉनसन यांच्यासारख्या हॉलिवूड अभिनेत्री नीरव मोदींच्या ज्वेलरीच्या ग्राहक होते.