मुंबई | 18 डिसेंबर 2023 : दाऊद इब्राहिम… भारताचा सर्वात मोठा दुश्मन… दाऊदवर विषप्रयोग केल्याची जगभर चर्चा सुरु आहे. त्यांची प्रकृती खालावली असल्याचीही माहिती आहे. भारताची आर्थिक राजधानी मुंबईवर हल्ला करणारा, बॉम्बस्फोट घडवून निरापराध लोकांचे प्राण घेणारा दाऊद इब्राहिम नेमका कोण आहे? दाऊदचा जन्म कुठे झाला? एका पोलीस कॉन्स्टेबलचा मुलगा अंडरवर्ल्ड डॉन कसा झाला? त्याची लाईफस्टोरी काय आहे? त्याची लाईफस्टाईल कशी आहे? विष प्रयोगानंतर तो नेमका कसा आहे? सगळ्या प्रश्नांची उत्तरं अन् अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा डोंगरी ते दुबई प्रवास, वाचा…
दाऊद इब्राहिम कासकरचा जन्म महाराष्ट्रातील रत्नागिरीत 1955 साली झाला. दाऊदचे वडील इब्राहिम कासकर हे पोलीस कॉन्स्टेबल होते. नंतर कासकर कुटुंब मुंबईतील डोंगरी भागात स्थायिक झालं. 70 च्या दशकात अंडरवर्ल्डच्या जगात दाऊदचं नाव मोठं होऊ लागलं. दाऊदचा भाऊ साबीर इब्राहिम कासकर याची 1981 ला हत्या झाली. त्यानंतर दाऊदच्या मनात जो राग निर्माण झाला त्यातूनच दाऊद मोस्ट वॉंटेड अंडरवर्ल्ड डॉन बनला. दाऊद आधी हाजी मस्तानच्या गँगमध्ये काम करत होता. तिथं त्याचा प्रभाव वाढू लागला. नंतर त्याच्या गँगला डी-कंपनी नावाने संबोधलं जाऊ लागलं.
दाऊद डी-कंपनीचा म्होरक्या होता. 90 च्या दशकात तर त्याची मुंबईत जबरदस्त दहशत होती. साल होतं, 1993 चं… दिवस होता 12 मार्चचा अन् स्थळ होतं देशाची आर्थिक राजधानी मुंबई… एकाच दिवशी मुंबईत साखळी बॉम्बस्फोट झाले. 11 ठिकाणी झालेल्या या बॉम्बस्फोटमध्ये 250 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. या सगळ्या घटनेमागे एका डॉनचं नाव होतं. तो डॉन म्हणजे दाऊद इब्राहिम….
दाऊद इब्राहिम हा मोस्ट वॉंडेट अंडरवर्ल्ड डॉन आहे. त्याची 15 टोपणनावं आहेत. दाऊद इब्राहिम, शेख दाऊद हसन, अब्दुल हामिद अब्दुल अजीज, अनीस इब्राहिम, अजीज दिलीप, दाऊद हसन शेख इब्राहिम कासकर, दाऊद इब्राहिम मेमन कासकर, दाऊद हसन इब्राहिम कासकर, दाऊद इब्राहिम मेमन, दाऊद साबरी, कासकर दाऊद हसन, शेख मोहम्मद इस्माइल अब्दुल रहमान, दाऊद हसन शेख इब्राहिम, शेख इस्माइल अब्दुल आणि हिजरत ही दाऊदची टोपणनावं आहेत.