US President Election 2024 : जागतिक महासत्तेच्या सर्वोच्च पदी भारतीय? विवेक रामास्वामी आहेत तरी कोण?

| Updated on: Aug 23, 2023 | 10:12 AM

US President Election 2024 : जागतिक महासत्तेच्या सर्वोच्च पदी एखादी भारतीय वंशाची व्यक्ती बसू शकते का? ब्रिटेने आणि काही देशांच्या उदाहरणावरुन आता जर-तर पर्यंत हा विषय येऊन ठेपला आहे. कोण आहेत विवेक रामास्वामी, का होत आहे त्यांच्या निर्णयाची चर्चा?

US President Election 2024 : जागतिक महासत्तेच्या सर्वोच्च पदी भारतीय? विवेक रामास्वामी आहेत तरी कोण?
Follow us on

नवी दिल्ली | 23 ऑगस्ट 2023 : अमेरिकेत पुढील वर्षी राष्ट्राध्यक्षाची निवड (US President Election 2024 ) होणार आहे. डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिकन पक्षात आतापासून रस्सीखेच सुरु आहे. तर या पक्षात पण राष्ट्राध्यक्ष पदासाठी कोण उमेदवार जोरदार आहे, याची शर्यत लागली आहे. राष्ट्राध्यक्ष पदाची निवड अनेक फेऱ्यातून जाते. सध्या जगात अनेक मोठ्या कंपन्यांचे सीईओ भारतीय आहेत. युनो, वर्ल्ड बँक आणि इतर महत्वाच्या पदावर भारतीयांचा बोलबाला आहे. काही देशांच्या राजकारणात पण भारतीयांनी चांगली कामगिरी बजावली आहे. ब्रिटेनमध्ये कधी भारतीय वंशाचा पंतप्रधान असेल, हे कोणाला स्वप्नात सुद्धा वाटले नव्हते. पण तसे घडले. त्यामुळेच जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष मूळ भारतीय वंशाचा असेल, हे स्वप्न पाहणं काही गैर नाही. विवेक रामास्वामी (Vivek Ramaswamy) यांचं नाव यामुळेच राष्ट्राध्यक्ष पदाच्या शर्यतीत सर्वाधिक गाजत आहे. आहेत तरी कोण रामास्वामी, पक्षातच ते कोणाला टफ फाईट देत आहेत?

ट्रम्प तात्यांना आव्हान

तर विवेक रामास्वामी हे मूळ भारतीय आहेत. ते रिपब्लिकन पक्षाचे अमेरिकेतील नेते आहेत. त्यांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदासाठी उमेदवारी जाहीर केली आहे. रामास्वामी यांचा जन्म अमेरिकेतीलच. त्यांचे शिक्षण ही या प्रगत राष्ट्रात झाले. हॉर्वड विद्यापीठातून त्यांचे शिक्षण झाले आहे. त्यांनी कायद्याचे शिक्षण पूर्ण केले आहे. ते एक उद्योजक पण आहेत. ते ‘anti-woke activist’ म्हणून तिथे प्रसिद्ध आहेत. ते माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना आव्हान देत आहे. ट्रम्प पुन्हा राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरले आहेत.

हे सुद्धा वाचा

पक्षातंर्गत मोठी लढाई

डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिकन पक्षात उमेदवारांना राष्ट्राध्यक्ष पदासाठी अगोदर स्वतःला सिद्ध करावे लागते. ही प्रक्रिया पक्षातंर्गत सुरु असते. त्यानंतर उमेदवाराची निवड होते. दोन्ही पक्षांमधील हा निवडलेला उमेदवार मग राष्ट्राध्यक्ष पदासाठी लढतो. सध्या रिपब्लिकन पक्षात डोनाल्ड ट्रम्प यांचे पारडे जड असले तरी दुसऱ्या क्रमांकावर विवेक रामास्वामी यांनी झेप घेतली आहे.

वडील होते इंजिनिअर

विवेक रामास्वामी हे मुळचे केरळ राज्यातील पलक्कड येथील आहेत. त्यांचे वडील गणपती रामास्वामी इंजिनिअर होते. ते अमेरिकेला गेले. तर आई गीता या मानसोपचारतज्ज्ञ होत्या. त्यांचा जन्म, शिक्षण सर्व अमेरिकेतच झाले आहे. त्यांनी Inside corporate America’s Social Justice Scam, हे पुस्तक पण लिहले आहे. ते युद्धाच्या विरोधात आणि स्थलांतर विरोधक विचारसरणीचे म्हणून ओळखल्या जातात.

एलॉन मस्क पण फॅन

टेस्ला आणि ट्विटरचे सर्वेसर्वा एलॉन मस्क हे पण विवेक रामास्वामी यांचे खूप मोठे चाहते आहेत. त्यांनी रिपब्लिकन पक्षासाठी आणि अमेरिकेसाठी विवेक रामास्वामी सर्वात योग्य आणि आश्वासक उमेदवार असल्याची पसंती पण देऊन टाकली. त्यांना सध्या ट्रम्पनंतर सर्वाधिक मते आहेत. पक्षाची उमेदवार निवड ही एक दीर्घ प्रक्रिया आहे. त्यामुळे पुढील काही महिन्यात रामास्वामी किती मजल मारतात. कोणत्या मुद्यावर त्यांना काय प्रतिसाद मिळतो, हे समोर येईल.  त्यानंतर राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उमेदवाराचा खरा कस लागतो. पण ट्रम्प यांना पक्षातंर्गत आव्हान उभे करणे हे पण नसे थोडके.