नवी दिल्ली | 4 फेब्रुवारी 2024 : मालदीवसारख्या देशाने भारताकडे डोळे वटारण्यास सुरवात केली आहे. मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मुईज्जू यांनी आधी चीनला भेट दिली, त्याचे सहकार्य घेतले. त्यापाठोपाठ पाकिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधान अनवारुल हक काकड यांच्याशी फोनवरुन चर्चा केली. हे दोन्ही देश भारताचे शत्रू आहेत असे असतानाही मुईज्जू यांची ही पावले भारतविरोधी असल्याचा सूर देशभरातून उमटत आहे. अशातच भारताच्या मदतीसाठी एका बड्या देशाने मदतीचा हात पुढे केला आहे. चीन आणि पाकिस्तानचा काळ ठरतील अशी शस्त्रे हा देश भारताला देणार आहे.
गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिका दौरा केला होता. या दौऱ्यादरम्यान एक करार करण्यात आला होता. सुमारे चार अब्ज डॉलर्सचा हा करार होता. या कराराला अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने मंजुरी दिली आहे. या करारा अंतर्गत भारताला 31 सशस्त्र ड्रोन, क्षेपणास्त्रे, लेझर बॉम्ब आणि इतर दळणवळण आणि सेवा उपकरणे मिळणार आहेत. अमेरिकन संसदेची मंजुरी मिळाल्यानंतर या करारावर चर्चा पुढे सरकणार आहे.
चीन आणि पाकिस्तानच्या सीमेवर शत्रूच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी या ड्रोनचा वापर केला जाऊ शकतो. याशिवाय, हे क्षेपणास्त्र आणि स्मार्ट बॉम्बने सुसज्ज आहे जे शत्रूचा तळ नष्ट करू शकतात. हा करार शक्य करण्यात जनरल ॲटॉमिक्स ग्लोबल कॉर्पोरेशनचे डॉ. विवेक लाल यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
प्रीडेटर ड्रोनला MQ-9 रीपर असेही म्हणतात. हे ड्रोन सतत 36 तास हवेत उडू शकते. 50 हजार फूट उंचीवर ते 3000 किमीपर्यंत प्रवास करू शकते. हे ड्रोन कोणत्याही प्रगत लढाऊ विमानापेक्षा कमी नाही. त्यावर धोकादायक क्षेपणास्त्रे बसवता येतात. अचूक लक्ष्य ठेवून शत्रूचा तळ नष्ट करू शकते. हे केवळ शत्रूवर नजर ठेवण्याच्या यंत्रणेने सुसज्ज नाही तर शांतपणे लक्ष्य अचूकपणे मारण्यातही निपुण आहे.
प्रीडेटर ड्रोनच्याच सहाय्याने अमेरिकेने इराणचे जनरल कासिम सुलेमानी यांना ठार केले होते. नौदलाला 15 तर लष्कर आणि हवाई दलाला प्रत्येकी 8 ड्रोन देण्याची सरकारची योजना आहे. पाकिस्तान आणि चीन सीमेवर शत्रूच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी याचा वापर केला जाऊ शकतो. हेलफायर मिसाईल आणि त्यावर बसवलेले लेझर स्मार्ट बॉम्ब हे शत्रूचे तळ क्षणात उद्ध्वस्त करू शकतात.