नवी दिल्ली | 14 ऑक्टोबर 2023 : इस्रायलवर हमासने हल्ला केल्यानंतर इस्रायलने युद्धाला सुरुवात केली असून या युद्धाने विनाशकारी रुप घेतले आहे. यामुळे जगातील अनेक देश चिंतेत आहेत. या युद्धात केवळ सात दिवसात दोन्ही कडील बाजूचे सुमारे 3200 लोक ठार झाले आहेत आणि 12 हजार लोक जखमी झाले आहेत. या युद्धात अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडन यांनी इस्रायलला पाठिंबा दिला असला तरी अमेरिकेला चिंता देखील वाटत आहे. त्यांना भीती वाटत आहे की गाझावरील युद्धानंतर इस्रायल पुढे काय करणार ? कारण यासंदर्भात इस्रायलकडे कोणताही प्लान दिसत नाही.
अमेरिकन प्रशासन इस्रायलवर हमासला संपविण्याच्या तात्काळ निर्णयाहून अधिक विचार करण्याची अपेक्षा बाळगत आहे. इस्रायलने 24 तासात गाझा रिकामे करण्याच्या केलेल्या मागणीवरुन अमेरिकेला चिंता वाटत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. यासंदर्भात असे बंधन घालणे अनावश्यक असल्याचे युरोपीय संघ आणि संयुक्त राष्ट्र दोघांचे म्हणणे आहे. इस्रायलने अशी मागणी केल्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे प्रवक्ते जॉन किर्बी यांनी लगेच म्हटले आहे की गाझातून बाहेर पडण्यासाठी अधिक वेळ द्यायला हवा होता.
इस्रायलला अमेरिकेने पाठिंबा जरी दिला असला तरी गाझाचा बदला घेण्याच्या लढाईचा शेवट काही दिसत नसल्याने व्हाईट हाऊस चिंतीत आहे. यामुळे इस्रायलच्या मागच्या 50 वर्षांच्या इतिहासातील सर्वात वाईट संकट निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे. तसेच क्षेत्रीय संघर्ष भडकण्याचाही धोका निर्माण झाला आहे. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री एंटनी ब्लिंकन इस्रायल दौऱ्यावर गेले आहेत. त्यांनी गुरुवारी चारही देशांचे दौरे केले आहे.
अमेरिकेला युद्ध पसरु नये आणि ओलिसांच्या सुटकेसाठी मदत करावी असे वाटत आहे. ब्लिंकन यांनी इस्रायलला काही सावधानता बाळगण्याचा आग्रह केला आहे. हिंसा पसरु नये असे त्यांनी म्हटले आहे. इस्रायलला गाझासाठी दीर्घकालिन योजनेवर काम करण्याची गरज आहे. गेल्या पंधरा वर्षांपेक्षा ते जे काही करत आहेत त्यापेक्षा ती वेगळी असावी असे मॅसाच्युसेट्स डेमोक्रेट आणि हाऊस सर्व्हीसेस कमिटीचे सदस्य सेठ मॉलटन यांनी म्हटले आहे.