जिनेव्हा : संपूर्ण जगात 2020 हे वर्ष कोरोना या साथीरोगाचा सामना करतानाच संपत आलंय. मात्र, या संकटांची मालिका येथेच थांबणार नसून आगामी 2021 वर्षातही अनेक नवी संकट येणार असल्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) दिलाय. WHO ने 2021 मध्ये जगावर कोणती आरोग्य विषयक संकटं येतील (Global Health Challenges) याची एक संभाव्य यादीच जाहीर केली आहे. याशिवाय 2021 मधील या संकटांचा सामना कसा करावा यासाठी WHO ने 10 उपाययोजना देखील सुचवल्या आहेत (WHO suggest 10 steps to fight upcoming health challenges of 2021).
यावर्षी कोरोना विषाणूने (Corona Virus) जगभरातील 1.75 मिलियन नागरिकांना बाधा केल्याने अनेक देशांच्या आरोग्य यंत्रणा कोलमडल्या आहेत. डब्ल्यूएचओने म्हटलं आहे की कोरोनाच्या संसर्गाने मागील 20 वर्षांमध्ये झालेल्या आरोग्य यंत्रणेच्या प्रगतीला मागे नेलं आहे. त्यामुळे आगामी वर्ष 2021 मध्ये जगाला आपली आरोग्य यंत्रणा मजबूत करण्यासाठी चांगलीच मेहनत घ्यावी लागणार आहे. असं झालं तरच कोरोना लस नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहचवता येईल.
2021 मधील संकटांचा सामना करण्यासाठीच्या 10 उपाययोजना
1. आरोग्य सुरक्षेसाठी जगाने एकजूट व्हावं : जगभरातील देशांनी संकटाच्या काळासाठी आपली आरोग्य यंत्रणा सुसज्ज करण्यासाठी एकजूट होऊन प्रयत्न करावेत. यात समाजातील सर्वात कमकुवत समुहांना प्राधान्य देण्याची गरज आहे.
2. कोरोना चाचणी, औषधं आणि लस निर्मितीचा वेग वाढवणे : नागरिकांना लस आणि कोरोनावरील उपचार मिळतील याची व्यवस्था करावी लागेल. जागतिक आरोग्य संघटनेने 2 मिलियन लस, 245 मिलियन उपचार, मध्यम आणि दारिद्र्य रेषेखालील उत्पन्न असणाऱ्या देशांमध्ये 500 मिलियन चाचणीची सुविधा देण्याची घोषणा केली आहे. तसेच या देशांमधील आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठीही प्रयत्न केले जाणार आहेत.
3. आधुनिक आरोग्य व्यवस्था तयार करणे : जगभरातील देशांना आपली आरोग्य यंत्रणा आधुनिक सुविधांसह विकसित करावी लागेल. जेणेकरुन कोरोना सारख्या संसर्गजन्य रोगांचा सामना करता येईल.
4. जगभरातील आरोग्य क्षेत्रातील विषमतेवर उपाययोजना कराव्या लागणार : डब्ल्यूएचओने सदस्य देशांना एकत्र येऊन उत्पन्न, लिंग, जात, शिक्षण, रोजगार, अपंगत्व इत्यादी गोष्टींमधील विषमता दूर करण्यावर काम करण्यास सांगितलं आहे.
5. विज्ञान आणि माहितीवर भर द्यावा लागणार : जगातील सर्व देशांना आपलं आरोग्य ध्येय पूर्ण करण्याच्या दिशेने आरोग्यविषयक माहिती/आकडेवारी आणि माहिती यंत्रणा अधिक मजबूत करण्यावर भर द्यावा लागेल.
6. लसीकरण अभियान पुन्हा सुरु करावं लागणार : मागील वर्षी डब्ल्यूएचओ अशा देशांना मदत करणार आहे ज्या देशांमध्ये कोरोना साथीरोगामुळे पोलिओ आणि इतर आजारांवरील लसीकरण थांबले आहे.
7. कॉम्बॅट ड्रग्ज रेझिस्टंन्स : देशातील साथीरोगांना हरवण्यासाठी उपचार करणे आणि त्यासाठी प्रभावी औषधं असणं आवश्यक आहे.
8. संसर्ग न होणारे आजार (एनसीडी) आणि आरोग्यविषयक इतर संकटांना रोखणे : डब्ल्यूएचओनुसार 2019 मध्ये मृत्यूला जबाबदार सर्वात मोठ्या 10 आजारांपैकी 7 एनसीडी म्हणजेच संसर्गाने न पसरणारे रोग आहेत. 2020 या वर्षात असे एनसीडी असलेले नागरिक कोविड-19 सारख्या संसर्गजन्य आजाराचे अधिक बळी ठरत असल्याचं दिसलं आहे.
9. पुन्हा एकदा आरोग्यदायी जगासाठी प्रयत्न करणे : कोविड-19 मुळे आपल्याला पुन्हा एकदा जगाला अधिक चांगलं, निसर्गसंपन्न आणि आरोग्यदायी होण्याची संधी दिलीय.
10. मतभेद विसरावे लागणार : आरोग्यविषयक आव्हानांचा सामना करण्यासाठी विविध देशांना अधिक एकजूट होऊन काम करण्याची गरज आहे. डब्ल्यूएचओने म्हटलं आहे, “विविध देश, संस्था, समुदाय आणि व्यक्तींना आपआपसातील मतभेद विसरावे लागतील.
संबंधित बातम्या :
कोरोनाच्या नव्या घातक प्रजातीवर जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा, युरोपीय देशांना विशेष सूचना
कोरोनाचा उगम नेमका कुठं? तपासासाठी WHO ची थेट चीनमध्ये धडक
WHO suggest 10 steps to fight upcoming health challenges of 2021