युद्धग्रस्त युक्रेनला जाण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी पोलंडला पोहचले आहेत. त्यांनी तिथे वसुधैव कुटुंबकमचा हुंकार भरला. आजचा भारत हा अलिप्त नाही तर सर्वांशी जोडू इच्छितो. आजचा भारत हा सर्वांच्याच विकासाची गोष्ट करतो. आजचा भारत हा सर्वांच्या सोबत आहे, असा संदेश भारताने दिला आहे. मोदींनी रशियाशी मैत्री असतानाच युक्रेनला साद घातली आहे. जागतिक स्तरावर भारताची काय आहे रणनीती? मोदी रशिया आणि युक्रेनमधील युद्ध थांबवण्याचा खरंच प्रयत्न करत आहेत का?
युद्ध नाही जगाला बुद्धाची गरज
पोलंड दौऱ्यावर असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगाला युद्धाची नाही तर बुद्धाची गरज असल्यावर भर दिला. भारत हा शांततेवर विश्वास ठेवणार देश असल्याचे त्यांनी सांगितले. वॉरसा येथून मोदींनी हा संदेश जगाला दिला. त्यामुळे युक्रेनच्या दौऱ्यावर जाण्यापूर्वी भारताच्या रणनीतीवर जगभरात चर्चा सुरु आहे. रशिया आणि युक्रेनमधील सुरु असलेले युद्ध ते खरंच थांबवतील का? मोदी हे शांतीदूत आहेत का?
23 ऑगस्ट रोजी ते युक्रेन दौऱ्यावर जात आहे. गेल्या 30 वर्षांत पहिल्यांदाच एखादा भारतीय पंतप्रधान युक्रेन दौऱ्यावर जात आहे. गेल्या दोन वर्षांहून अधिक काळापासून रशिया-युक्रेनमध्ये युद्ध सुरु आहे. या युद्ध काळातच मोदी युक्रेन दौऱ्या जात असल्याने जगाला मोठा संदेश गेला आहे. मोदी शांतीदूत ठरतील का? ते खरंच या दोन देशातील युद्ध थांबवतील का? त्यांना शांततेचा नोबेल पुरस्कार मिळेल का? अशा अनेक चर्चा सुरु आहे.
युरोपचे ब्रेड बॉस्केट
युक्रेन हा सूर्यफुलाचे उत्पादनात अग्रेसर आहे. भारत य देशाकडून सूर्यफुलाच्या तेलाची मोठी आयात करतो. युक्रेन गहू उत्पादनात पण जगात सर्वात आघाडीवर आहे. युक्रेन हा युरोपचा ब्रेड बॉस्केट असल्याचे बोलले जाते. या देशाच्या भूगर्भात खनिजाचा साठा आहे. जगाला युक्रेनची गरज आहे. खाद्यतेलासाठी भारताला युक्रेनची मदत हवी आहे.
एक फोन आणि युद्ध थांबले
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोन करुन रशिया आणि युक्रेनमधील युद्ध दोनदा थांबवले होते, असा दावा यापूर्वी परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी मे महिन्यात दिलेल्या मुलाखतीत केला होता. मोदींनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना फोन केला होता. भारतीय विद्यार्थ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी त्यांनी युद्ध थांबवण्याची विनंती केल्याचा दावा करण्यात आला होता. त्यानंतर मोदींनी पुतिन आणि जेलेन्स्की यांच्याशी चर्चा करुन पुन्हा युद्ध थांबवले आणि विद्यार्थ्यांना सुरक्षित बाहेर काढल्याचा दावा करण्यात आला होता. या युद्धावर मोदींनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी युद्धाचा विरोध केला. पण या रशियाने केलेल्या हल्ल्याचा अद्याप निंदा केलेली नाही. तर दुसरीकडे युक्रेनमधील युद्ध पीडिताना मदत म्हणून जवळपास 135 टन सामान पाठवण्यात आले आहे. त्यात औषधी, टेंट, मेडिकल उपकरण आणि खाद्य सामुग्रीचा समावेश आहे. आता दोन देशातील युद्ध थांबेल का, त्यासाठी मोदी हे कारण ठरतील का? त्यांना शांततेचा नोबेल पुरस्कार मिळेल का? या प्रश्नांना काही दिवसातच उत्तर मिळतील, हे नक्की.