Woman Stabs Needle In Boyfriend’s Eye : बॉयफ्रेंडचा बदला घेण्यासाठी एका महिलेने एवढं भयानक पाऊल उचललं, ज्याबद्दल समजल्यावर सगळेच हैराण झाले आहेत. एक महिला तिच्या बॉयफ्रेंडवर एवढी चिडली होती की तिने त्याच्या डोळ्यात थेट सुईच खुपसली. आणि ही सुई साधीसुधी नव्हती, तर ते होतं रेबीजचं इंजेक्शन. वाचून तुम्हीदेखील हादरलात ना. पण हे खरं आहे. अमेरिकेतील फ्लोरिडा येथे ही भयानक घटना घडली. आरोपी महिला गेल्या आठ वर्षांपासून तिच्या बॉयफ्रेंडसोबत लिव्ह-इनमध्ये रहात होती. पण गेल्या शनिवारी तिला अचानक इतका राग आला की तिने पुढचा-मागचा काहीच विचार न करता हे पाऊल उचलले.
तो सोफ्यावर झोपला होता, तितक्यात तिने केला हल्ला
nypost नुसार, मियामी-डेड काउंटीमधील एका घरात हा प्रकार घडला. सैंड्रा जिमेनेज असे आरोपी महिलेचे नाव आहे. सँड्रा आणि तिचा बॉयफ्रेंड आठ वर्ष लिव्ह इनमध्ये होते. पण तिचा बॉयफ्रेंड इतर मुलींकडेही पहायचा. यामुळे सँड्रा प्रचंड संतापली होती. शनिवारी रात्री 10च्या सुमारास ते दोघे घरी गेले, तेव्हा सँड्राने तिच्या बॉयफ्रेंडवर हल्ला केला. तो सोफ्यावर झोपलेला असतानाच तिने त्याच्या अंगावर उडी मारली आणि त्याच्या उजव्या डोळ्यात थेट सुई खुपसली. ते रेबीजचं इंजेक्शन होतं.
पीडित इसमाच्या सांगण्यानुसार, त्याने हे इंजेक्शन त्याच्या कुत्र्यांसाठी आणले होते. पण सँड्राच्या मनात काय चालले आहे याची त्याला कल्पना नव्हती. या हल्ल्यानंतर त्याच्या उजव्या डोळ्याला बरीच दुखापत झाली. वेदनेने व्हिवळणाऱ्या त्याने कसाबसा 911 वर कॉल करून पोलिसांना बोलावलं. घरी पोहोचल्यावर समोरचं दृश्य पाहून पोलिसांनाही धक्का बसला, त्यांनी त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र नंतर तेथून त्याला जॅक्सन मेमोरियल हॉस्पिटलमध्ये रेफर करण्यात आले.
हल्ल्यानंतर सँड्राने काढला पळ
बॉयफ्रेंडवर हल्ला केल्यानंतर सँड्राने घटनास्थळावरून पळ काढला. मात्र काही वेळातच पोलिसांनी ती तिच्या कारमध्ये झोपलेली आढळली. पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं. मात्र आपण हा हल्ला मुद्दाम केला नसल्याचे तिने बचावार्थ सांगितले. आमच्या दोघांचा वाद सुरू होता, आणि त्या दरम्यानच बॉयफ्रेंडला, त्याच्या चुकीमुळेच ही दुखापत झाल्याचा दाव सँड्राने पोलिसांसमोर केला. सध्या तिला सुधारगृहात ठेवण्यात आले आहे. याशिवाय तिला साडेसात हजार डॉलर्सचा दंडही ठोठावण्यात आला आहे.