वॉशिंग्टन | 11 फेब्रुवारी 2024 : जगातील सर्वात मोठ्या अशा शक्तीशाली देशाला प्रचंड मोठा ‘व्हाइट गोल्ड’चा साठा सापडला आहे. सुमारे 2 अब्ज टन इतका हा साठा आहे. ‘व्हाइट गोल्ड’ची गणना दुर्मिळ पृथ्वी खनिजांमध्ये केली जाते. याचा उपयोग शस्त्रे आणि स्मार्टफोन बनवण्यासाठी केला जातो. हा साठा सापडल्यामुळे ‘व्हाइट गोल्ड’वरील चीन देशाची मक्तेदारी संपुष्टात आली आहे. भारत देशालाही याचा मोठा फायदा होणार आहे. विशेष म्हणजे केवळ 25 टक्के भागातच हा इतका मोठा प्रचंड साठा सापडला आहे. त्यामुळे आणखी किती मोठ्या प्रमाणात साठा सापडणार आहे याची त्या देशालाही उत्सुकता आहे.
चीनसोबत सुरू असलेल्या संघर्षादरम्यानच अमेरिकेला अब्जावधी डॉलर्सचा खजिना मिळाला आहे. अमेरिकेला वायोमिंगमध्ये 2.34 अब्ज मेट्रिक टन दुर्मिळ पृथ्वीची खनिजे सापडली आहेत. या शोधामुळे अमेरिका लवकरच पृथ्वीच्या दुर्मिळ खनिजांबाबत चीनला मागे टाकू शकते. अमेरिकेला सापडलेला हा नवीन साठा चीनच्या 44 दशलक्ष मेट्रिक टनांच्या साठ्याला मागे टाकेल इतका प्रचंड मोठा आहे.
चीन देशाकडे ‘व्हाइट गोल्ड’चा मोठा साठा होता. त्याच बळावर चीन अनेकदा आपला मुद्दा मांडण्यासाठी जगातील दुर्मिळ पृथ्वीचा पुरवठा थांबवण्याची धमकी देत होता. मात्र, आता अमेरिकेला मोठा सापडल्याने चीनची अडचण निर्माण झाली आहे. अमेरिकन कंपनीने वायोमिंगमधील शेरीडन जवळ मार्च 2023 मध्ये पहिले उत्खनन सुरू केले. या उत्खनन दरम्यान वायोमिंगमध्ये 12 लाख मेट्रिक टन दुर्मिळ पृथ्वी खनिज सापडले आहे. येथे अजूनही उत्खनन चालू आहे. ज्यामधून अनेक शोध समोर येऊ शकतात असे अमेरिकन कंपनीने सांगितले.
अमेरिकन कंपनीच्या उत्खननामध्ये सापडलेले हे खनिज केवळ 25 टक्के ड्रिल क्षेत्रात सापडले आहे. याशिवाय कंपनीकडे हॅलेक क्रीक प्रकल्पातील आणखी 367 ठिकाणी खाण हक्क आहेत. तर, वायोमिंगमधील 1844 एकर क्षेत्रात 4 ठिकाणी खाण हक्क आहेत. हे 2 अब्ज टन दुर्मिळ पृथ्वी खनिज मौल्यवान खनिजांच्या बाबतीत अमेरिकेला राजा बनवू शकतात असे कंपनीचे म्हणणे आहे.
‘व्हाइट गोल्ड’ हे अत्यंत दुर्मिळ पृथ्वी खनिज आहे. याचा वापर स्मार्टफोनपासून कार, विमान, लाइट बल्ब, दिवे या सर्व गोष्टींमध्ये केला जातो. पृथ्वीवरील फार कमी देशांमध्ये हे खनिज आढळते. तर, सध्या जगातील ‘व्हाइट गोल्ड’चा 95 टक्के साठा चीनमधून येतो. त्यामुळेच चीनची मक्तेदारी सहन करण्यात येत होती. शस्त्रे बनविण्यासाठीही या ‘व्हाइट गोल्ड’चा वापर केला जातो.
वायोमिंग प्रकल्पातील केवळ 25 टक्के खोदकाम झाले आहे. त्यात हा 2 अब्ज टन इतका साठा सापडला आहे. याची एकूण किंमत 37 अब्ज डॉलर्स आहे. आत्तापर्यंत या क्षेत्रात फक्त 100 ते 200 फुटांपर्यंतच चाचणी केली आहे. त्यामुळे आणखी मोठ्या प्रमाणात हा साठा सापडेल असा विश्वास कंपनीला आहे. सध्या भारत हा अमेरिकेसोबत व्हाईट गोल्ड आणि लिथियमसारख्या खनिजांसाठी वाटाघाटी करत आहे. त्यामुळे या साठ्याचा भारतालाही मोठा फायदा होणार आहे.