ख्रिसमस हा जगात साजरा केला जाणारा सण आहे. ख्रिश्चन धर्मीयांचा हा सण असला तरी तो आता सर्वच धर्मीय साजरा करत असतात. धर्माच्या सीमा ओलांडून गेलेला हा सण आहे. जगात अनेक ठिकाणी सर्व लोक केक कापून, पार्ट्या करत नाताळ साजरा करतात. याच दिवशी प्रभू येशूचं आगमन झालं होतं. त्यांच्या स्वागताची सर्वच तयारी करत असतात. पण काही देशांमध्ये ख्रिसमस साजरा करण्यावर बंदी आहे, हे माहीत आहे का? वाचून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. या देशांमध्ये परवानगी न घेता ख्रिसमस साजरा केल्यास शिक्षा, दंड आणि कारावास भोगावा लागतो. ख्रिसमस साजरा करण्यावर बंदी घालणारे कोणते देश आहेत ते आज आपण पाहणार आहोत.
सौदी अरेबिया
मुस्लिमांचं राज्य असलेला सौदी अरेबिया या देशात कठोर नियम आहेत. सौदीत ख्रिश्चन धर्मीयांसाठी किंवा इतर धर्मीयांसाठी केवळ तात्पुरतेच काम करण्याची परवानगी आहे. या ठिकाणी ख्रिश्चन लोकांना धार्मिक विधी गुप्तपणेच साजरे करावे लागतात. उघडपणे ख्रिसमस साजरा केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाते. सौदी अरेबियात ख्रिसमसवर बंदी घालणारा कायदा आहे. पण या कायद्यानुसार कुणाला शिक्षा झालीय का याचा डेटा अद्याप उपलब्ध झालेला नाही.
उत्तर कोरिया
उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जोंग उन यांनी 2016 मध्ये उत्तर कोरियात 25 डिसेंबरला ख्रिसमस साजरा करण्यावर बंदी घातली आहे. त्याऐवजी, आपल्या आजीला श्रद्धांजली अर्पण करण्याचा फतवा किम यांनी काढला आहे. किम जोंग उन यांच्या आजीचा जन्म 1919 मध्ये 25 डिसेंबरच्या रात्री झाला होता. त्यामुळे या ठिकाणी ख्रिसमसवर बंदी आहे. परिणामी येथील नागरिकांना अध्यक्षाच्या आजीलाच श्रद्धांजली अर्पण करावी लागते.
ताजिकिस्तान
ताजिकिस्तान हा आणखी एक मुस्लिम बहुसंख्य देश आहे. या देशातही ख्रिसमस साजरा करणे बंदी आहे. 2015 डिसेंबरमध्ये ताजिकिस्तानच्या शिक्षण मंत्रालयाने शाळांमध्ये किंवा विद्यापीठांमध्ये ख्रिसमस झाडं लावणे किंवा इतर सण साजरे करण्यावर बंदी घातली होती. त्यानंतर, अधिक कडक बंदी घालण्यात आली. ख्रिसमसच्या दिवशी देशात फटाके फोडणे, खास मेन्यू बनवणे, भेटवस्तू देणे आणि धनसंचय करण्यावरही बंदी घालण्यात आलेली आहे.
ब्रुनेई
2014 डिसेंबरमध्ये ब्रुनेईने ख्रिसमस साजरा करण्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली. ख्रिसमसमुळे मुस्लिम लोकांमध्ये गोंधळ निर्माण होईल आणि त्यांच्या विश्वास तसेच श्रद्धांना धक्का बसेल, असे सांगून नाताळ साजरा करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. ब्रुनेईमध्ये ख्रिसमस साजरा करणाऱ्यांना 20,000 डॉलर दंड आणि पाच वर्षांपर्यंत कारावास होऊ शकतो.
सोमालिया
सोमालियाने 2015 मध्ये ख्रिसमस साजरा करण्यावर बंदी घातली. ख्रिसमससारख्या सणांमुळे मुस्लिमांच्या श्रद्धांना धोका होऊ शकतो, कारण ख्रिसमस इस्लामशी संबंधित नाही, असं सोमालियाच्या सरकारने जाहीर केलं आहे. ख्रिसमसमध्ये नृत्य, मद्यपान यांसारख्या गोष्टी होतात. त्यामुळे देशात ख्रिसमस साजरा करणे बंदी घालणे आवश्यक आहे, असं सोमालियाच्या धार्मिक मंत्रालयाने म्हटलं आहे.