केंद्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात एनडीएचे सरकार गठीत झाले. पंतप्रधान यांच्यासह 72 मंत्र्यांनी शपथ घेतली. मंत्री आणि खासदारांकडे अगोदरच बंगले आहेत. आता नवीन निवडलेले खासदार आणि मंत्र्यांना दिल्लीत निवासस्थान देण्यात येतील. देशाच्या राजधानीत मंत्री आणि खासदारांना नवीन बंगले कसे वाटप करण्यात येतात, असा सवाल तुमच्या मनात आला असेल तर त्याचे उत्तर काय आहे? चला तर शोधूयात…काय असते ही प्रक्रिया, कुणाला देण्यात येतो बंगला?
या कायद्याने मिळतो बंगला
केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या अंतर्गत 1922 मध्ये स्थिती संचालनालय हा विभाग तयार करण्यात आला होता. देशभरातील केंद्र सरकारच्या सर्व मालमत्तांची देखरेख हा विभाग करतो. मंत्री आणि खासदारांना देण्यात येणारा बंगला, फ्लॅट यांच्या देखभालीची जबाबदारी या विभागाची आहे. तर बंगले, सदनिका यांचे वाटप आणि ते रिकामे करण्याची जबाबदारी याच विभागाची आहे. या विभागाला लोकसभा आणि राज्यसभेतील निवास समिती पण मदत करते. निवास कायद्यातंर्गत हा विभाग बंगल्यांचे, फ्लॅटचे वाटप करतो.
दिल्लीत सरकारी निवास कुठे?
लुटियंस झोनमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे 17 सरकारी बंगले, साधी घरं, हॉस्टेल, फ्लॅट आणि गेस्ट हाऊस आहेत. मध्य दिल्लीमधील नॉर्थ एव्हेन्यू, साउथ एव्हेन्यू, विश्वंभर दास मार्ग, मीना बाग, बाबा खड़ग सिंह मार्ग, टिळक मार्ग आणि विठ्ठल भाई पटेल याठिकाणी सरकारी निवास आहेत. याठिकाणचे घर, बंगले हे कॅबिनेट, राज्य मंत्री आणि खासदारांना देण्यात येतात.
एकूण सर्व घरांची संख्या ही 3,959 इतकी असल्याचे सांगण्यात येते. यामध्ये लोकसभा सदस्यांकरीता एकूण 517 निवास उपलब्ध आहेत. त्यात 159 बंगले आहेत. याशिवाय 37 ट्विन फ्लॅट आहेत. तर 193 सिंगल फ्लॅट, बहुमजली इमारतीत 96 फ्लॅट आणि सिंगल रेग्युलर हाऊस 32 इतके आहेत.
कसे होते घरांचे वाटप
ज्येष्ठतेनुसार आणि श्रेणीनुसार घरांचे वाटप करण्यात येते. सर्वात छोटे टाईप-I ते टाईप-IV पर्यंतचे घर हे केंद्रीय कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना देण्यात येते. त्यानंतर टाईप-VI ते टाईप-VIII पर्यंतचे बंगले आणि घरे ही केंद्रीय मंत्री, राज्य मंत्री आणि खासदारांना देण्यात येतात. पहिल्यांदा निवडलेल्या खासदारांना साधारणपणे टाईप-V बंगले देण्यात येतात. जर एखादा खासदार एकाहून अधिक वेळा निवडून आल्यास त्याला टाईप-VII आणि टाईप-VII असा बंगला देण्यात येतो. तर टाईप-VIII बंगला कॅबिनेट मंत्री, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, माजी राष्ट्रपती, माजी उपराष्ट्रपती, माजी पंतप्रधान आणि वित्त आयोगाच्या अध्यक्षांना देण्यात येतो.
सर्वात मोठा बंगला टाईप-VIII
टाईप-VIII हा बंगला सर्वात मोठा आणि प्रशस्त आहे. हा बंगला जवळपास तीन एकर क्षेत्रफळात असतो. त्याच्या मुख्य इमारतीत पाच बेडरूम असतात. याशिवाय एक हॉल, एक डायनिंग रुम आणि एक अभ्यासिका असते. पाहुण्यांसाठी एक रूम आणि एक नोकरांसाठीची खोली असते. असे सर्व मोठे बंगले जनपथ, त्यागराज मार्ग, अकबर रोड, कृष्णा मेनन मार्ग, सफदरजंग रोड, मोतीलाल नेहरू मार्ग आणि तुघलक रोड वर आहेत.