भारताला स्वातंत्र्य मिळून 77 वर्षे पूर्ण झाली आहेत. आता देश 78 वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहे. 15 ऑगस्ट रोजी भारतीय स्वातंत्र्याचा उत्सव असतो. अनेक सरकारी कार्यालय, आस्थापनेवर दिमाखात तिरंगा डौलतो. काही दिवसांपासून खासगी कार्यालयासमोर पण राष्ट्रीय ध्वजाची शान दिसते. 15 ऑगस्टला तर आता सगळीकडे तिरंगा दिसेल. पण तिरंगा फडकवण्याचे पण नियम आहेत. तुम्ही कुठं पण तिरंगा फडकवू शकता का? तुम्ही तुमच्या छतावर, बालकनीत, घरावर तिरंगा लावू शकता का, काय आहे याविषयीचा नियम? घ्या जाणून…
घरावर तिरंगा फडकवण्याचे काय आहेत नियम ?
वर्ष 2002 पूर्वी केवळ स्वातंत्र्य दिनी आणि प्रजासत्ताक दिनीच तिरंगा फडकवता येत होता. आता केव्हा पण नागरिकांना तिरंगा फडकवता येतो. पण त्यासाठी काही नियम आहेत. या नियमांचे सर्वांनाच पालन करणे आवश्यक आहे. भारतीय ध्वज संहितेत हे नियम देण्यात आले आहेत.
भारतीय ध्वज संहिता 2002 मधील भाग-2, परिच्छेद 2.2 मधील कलम (11) नुसार, जर एखाद्या व्यक्तीला त्याच्या घरात तिरंगा ध्वज फडकवायचा असेल तर तो दिवसा आणि रात्री फडकवू शकतो. पण त्यासाठी अट आहे. या काळात ध्वज फाटणार नाही, खराब होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. चुकून तो फाटला तर त्याचा अनादर होता कामा नये. घरात अथवा छतावर झेंडा लावताना एका गोष्टीचे लक्ष ठेवा की, झेंडा हा मोकळ्या जागेत असावा. या झेंड्या व्यतिरिक्त दुसरा ध्वज उंच नसावा.
रात्री फडकवता येतो का तिरंगा?
पूर्वी तिरंगा केवळ सूर्योदयापासून ते सूर्यास्ताच्या दरम्यान फडकवता येऊ शकत होता. पण आता रात्री सुद्धा ध्वज फडकवता येतो. ध्वज जमिनीवर ठेवता येत नाही. जोपर्यंत सरकारचा अधिकृत आदेश येत नाही, तोपर्यंत राष्ट्रध्वज हा अर्ध्यावर फडकवता येत नाही. ध्वजाला पाण्यात बुडवता येत नाही. तिरंग्यावर कोणत्याही प्रकारचे अक्षर, संख्या लिहता येत नाही. राष्ट्रध्वज हा पडदा म्हणून, एखाद्या वस्तूवर आच्छादन म्हणून वापरता येत नाही. इतर कोणत्याही प्रकारचा ध्वज तिरंग्याहून वरील बाजूस फडकवता येत नाही.