नवी दिल्ली | 19 डिसेंबर 2023 : जर तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीवर दर महिन्याला निश्चित उत्पन्न मिळवायचे असेल तर पोस्ट ऑफिसची ही नवी योजना तुमच्यासाठी अधिक फायदेशीर ठरणार आहे. पोस्ट ऑफिसच्या या गुंतवणूक योजनेचे नाव मासिक उत्पन्न योजना आहे. या योजनेची सर्वात खास गोष्ट म्हणजे मासिक उत्पन्न योजनेत एकदा गुंतवणूक करून तुम्हाला दरमहा ९,२५० रुपये इतके पेन्शन मिळू शकते. अशा परिस्थितीत ही योजना तुमच्यासाठी नियमित उत्पन्न म्हणून काम करू शकेल.
पोस्ट ऑफिसच्या या योजनेत गुंतवणूक केल्याने अनेक मोठे फायदेही मिळत आहेत. पोस्ट ऑफिस योजनेत गुंतवणूक करून तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या बाजारातील जोखमीचा सामना करावा लागणार नाही. गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून ही योजना खूपच सुरक्षित आहे.
पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेचे फायदे आणि व्याजदर जाणून घ्या
मासिक उत्पन्न योजनेमध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला 7.4 टक्के व्याज मिळते. या योजनेसाठी पोस्ट ऑफिस स्कीममध्ये तुम्ही तुमचे खाते सिंगल किंवा जॉइंट अशा दोन्ही प्रकारे उघडू शकता. संयुक्त खात्यामध्ये एकूण तीन लोक एकत्र गुंतवणूक करू शकतात.
तुम्ही तुमच्या पत्नीसोबत संयुक्त खाते उघडल्यास या योजनेत जास्तीत जास्त 15 लाख रुपयांची गुंतवणूक करू शकता. जर तुम्ही या योजनेत 15 लाख रुपये जॉइंट अकाउंट अंतर्गत गुंतवले तर तुम्हाला 7.4 टक्के व्याज दराने वार्षिक 1.11 लाख रुपये उत्पन्न मिळेल. म्हणजेच दरमहा तुम्हाला सुमारे 9,250 रुपये मिळतील. जर या योजनेत तुमचे एकट्याचे खाते उघडले तर तुम्ही जास्तीत जास्त 9 लाख रुपयांची गुंतवणूक करू शकता. त्यामुळे तुम्हाला दरमहा 5,500 रुपये मिळतील.