मुंबई | 19 ऑक्टोबर 2023 : हल्ली मोबाईलवर जो तो ‘रिल्स’ तयार करुन सोशल मिडीयावर आपल्या व्हिडीओला लाईक्स मिळविण्याचा प्रयत्न करीत असतो. अशा प्रकारचे रिल्स किंवा व्हिडीओ तयार करताना प्रॅंक व्हिडीओ शूट करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यात जर असे प्रॅंक लहान मुलासोबत केले जात असतील तर त्याचा लहानग्यांच्या मनावर काय परिणाम होतो याचा पुन्हा एकदा विचार करायल हवा असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
गेल्या काही दिवसात आंध्रप्रदेश आणि तेलंगणात एक प्रॅंक व्हिडीओ बनविण्याचा ट्रेंड खूपच व्हायरल झाला होता. त्यात लोक आपल्या कारमध्ये लहान मुलांना लिफ्ट देऊन नंतर त्यांना तुम्हाला किडनॅप केले आहे असे सांगायचे. त्यामुळे लहानमुले घाबरुन रडायची. यावरुन खूप टीका झाली. तेव्हा प्रॅंक तयार करणाऱ्यांनी आम्ही लहान मुलांनी अनोळखी वाहनात बसू नये हे त्यांना समजविण्यासाठी हा प्रॅंक केल्याचा दावा केला होता.
आई-वडीलच आपल्या मुलांचा प्रॅंक करण्याचा एक ट्रेंड मागे आढळला होता. लहान मुलांच्या डोक्यावर अंडी फोडणे किंवा अन्य काही प्रकारे त्यांना दचकवून व्हिडीओत पालक मजा घेताना दिसत होते. परंतू याप्रकारामुळे लहान मुले जखमी होऊ शकतात किंवा त्यांना असे केल्याने दु:ख होऊ शकते याचा विचारच पालकांनी केलेला दिसला नाही. कोणताही प्रॅंक जोपर्यंत ज्याच्यावर तो केला आहे त्यानेही एन्जॉय करायला हवा तरच त्यात गंमत असते असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
अनेकदा लहान मुलांना त्यांच्याशी प्रॅंक केलेले अजिबातच आवडत नाही. भलेही पालकांना त्यात मजा वाटत असेल. परंतू मनोविकार तज्ज्ञांच्या मते लहान मुले या प्रॅंकला समजू शकत नाहीत. त्यांना हे आवडत नाही त्यांचे मन यासाठी तयार नसते. तज्ज्ञांच्या मते प्रॅंक एक असा प्रकार आहे ज्यात कोणाला तरी बळी किंवा टार्गेट केले जाते. एखादा चुटकुला सांगताना ऐकणारे आणि सांगणारे दोघेही एन्जॉय करीत असतात. परंतू प्रॅंकमध्ये तसे नसते. प्रॅंकमध्ये माणसावर एक प्रकारचा प्रयोग केला जातो. त्या प्रयोगात त्या व्यक्तीला जखम होऊ शकते किंवा तो घाबरु शकतो, किंवा त्याला वाईट वाटू शकते. लहान मुलांचे मन नाजूक असते. ते अशी मजा-मस्करी समजू शकत नाहीत. त्यामुळे त्यांच्यासोबत प्रॅंक करणे त्यांच्या मनाला लागू शकते.