मकर संक्रातीच्या उत्सवाला एक महिना उरला आहे. हिंदू धर्मातील हा एक पवित्र सण आहे. पौराणिक मान्यतेनुसार, हा सण नवीन फळे आणि नवीन ऋतूच्या आगमनासाठी साजरा केला जातो. जेव्हा सूर्य भगवान धनु राशी सोडून मकर राशीत प्रवेश करतात. तेव्हा मकर संक्रांती साजरी केली जाते. या दिवशी लाखो भक्त गंगा आणि इतर पवित्र नद्यांच्या काठावर स्नान करतात आणि दान देतात.
आगामी वर्षी मकर संक्रांत पौष महिन्यात म्हणजेच 15 जानेवारी 2024 रोजी साजरी होणार आहे. जो व्यक्ती या दिवशी आपले शरीर सोडतो तो मोक्ष प्राप्त करतो, असं भगवान कृष्णाने याच दिवशी सांगितल्याची धार्मिक मान्यता आहे. हिंदू धर्मातील सर्व सण प्रत्येक राज्यात साजरे केले जातात. परंतु मकर संक्रांतीचा सण वेगळा आहे. मकर संक्रांती प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या नावांने ओळखली जाते. तसेच वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. गुजरात सारख्या राज्यात या दिवशी मोठा पंतग उत्सव असतो. तर महाराष्ट्रासह काही ठिकाणी तिळगुळ देऊन हा उत्सव दणक्यात साजरा केला जातो.
उत्तर प्रदेशात मकर संक्रांतीला ‘दानाचा सण’ म्हटले जाते. मकर संक्रांतीपासून पृथ्वीवर शुभ सणांचा प्रारंभ होतो, असं मानलं जातं. मकर संक्रांतीच्या दिवशी स्नान केल्यानंतर दान देण्याची परंपरा आहे. या दिवशी गंगेच्या घाटावर महामेळाव्याचं आयोजन केलं जातं.
बिहारमध्ये मकर संक्रांतीला ‘खिचडी पर्व’ म्हणून ओळखले जाते. या दिवशी उडीदाची डाळ, तांदूळ, तिळ, आमसुल आणि उबदार कपड्यांचे दान करण्याची परंपरा आहे. बिहारमध्ये मकर संक्रांतीचे विशेष महत्त्व आहे आणि राज्यात सणाच्या निमित्ताने लोकांमध्ये एक वेगळाच उत्साह असतो.
पंजाब आणि हरियाणात हा सण 15 जानेवारीच्या एक दिवस आधी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या राज्यांमध्ये मकरसंक्रातीला ‘लोहरी सण’ असे म्हटले जाते. या दिवशी अग्निदेवतेची पूजा करताना तिळ, गुळ, तांदूळ आणि भाजलेली मका अग्नीत अर्पित केली जाते. हा सण नवीन वधू आणि नवजात मुलांसाठी खूप खास आहे. प्रत्येक व्यक्ती एकमेकांना तिळाचा पदार्थ देतात आणि लोहरी लोकगीते गातात.
आसाममध्ये मकरसंक्रातीला ‘माघ बिहू’ आणि ‘भोगाली बिहू’ म्हणून ओळखले जाते. तर, तमिळनाडूमध्ये हा सण 4 दिवसांपर्यंत साजरा केला जातो. आसाममध्ये मकरसंक्रातीचा पहिला दिवस ‘भोगी पोंगल’ म्हणून ओळखला जातो, दुसऱ्या दिवशी ‘सूर्य पोंगल’, तिसऱ्या दिवशी ‘मट्टू पोंगल’ आणि चौथा दिवस ‘कन्या पोंगल’ म्हणून ओळखला जातो.
पश्चिम बंगालमध्ये गंगासागर येथे या सणासाठी मोठ्या मेळाव्याचे आयोजन केले जाते. या सणाच्या दिवशी स्नान केल्यानंतर तिळाचे दान करण्याची परंपरा आहे. या दिवशी यशोदा माईने श्री कृष्णाची प्राप्ती करण्यासाठी व्रत केले होते. तसेच, या दिवशी माता गंगा भगीरथांचे अनुसरण करून गंगासागरात कपिल मुनीच्या आश्रमाशी भेटल्या होत्या, अशी अख्यायिका आहे.