Mukesh Ambani : देशातील नामवंत उद्योजकांपैकी एक असलेले मुकेश अंबानी हे आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. सध्या फोर्ब्सच्या श्रीमंत व्यक्तींच्या यादीत 14 व्या क्रमांकावर आहेत. त्यांची अंदाजे एकूण संपत्ती $88.4 अब्ज (अंदाजे रु. 7,32,221 कोटी) आहे. नुकतंच त्यांनी कठोर व्यायाम न करता 15 किलो हून अधिक वजन कमी करून सर्वांच लक्ष वेधून घेतलं. अंबानी कुटुंबाबाबत जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता असते. ते काय खातात, त्यांच्या आवडीचे पदार्थ कोणते, घरातील त्यांचं वागणं, त्यांचं आलिशान आयुष्य याबद्दल रोज काही ना काही छापून येतच असतं. अत्यंत श्रीमंत असणारे मुकेश अंबानी हे मात्र साधं आयुष्य जगतात. त्यांच्या खाण्यापिण्याच्या आवडीही तशाच साध्या आहेत.
आज आपण मुकेश अंबानी आणि त्यांची पत्नी नीता अंबानी यांची आवडती डिश कोणती आहे हे जाणून घेणार आहोत. संपूर्ण अंबानी कुटुंब अँटिलियामध्ये राहते. जे बकिंघम पॅलेसनंतर जगातील दुसरे सर्वात महागडे घर आहे. या घरात 600 हून अधिक कर्मचारी आहेत. प्रचंड संपत्ती असूनही मुकेश अंबानी हे खूप डाऊन टू अर्थ आहेत. त्यांना स्ट्रीट फूड आणि पारंपारिक घरगुती जेवणाचा आस्वाद घ्यायला आवडतो.
या अब्जाधीश दांपत्याचे आवडते पदार्थ कोणते ते जाणून घेऊया.
1. इडली सांबार
मुकेश अंबानींना दक्षिण भारतीय पदार्थ विशेषतः इडली सांबार खूप आवडतं. कॅफे म्हैसूर, मुंबईतील माटुंगा येथील किंग्ज सर्कल येथे असलेले प्रसिद्ध दक्षिण भारतीय रेस्टॉरंट हे त्याच्या आवडत्या जेवणाच्या ठिकाणांपैकी एक आहे. हे रेस्टॉरंट इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी (ICT) च्या परिसरात आहे. जिथे मुकेश अंबानी यांनी केमिकल इंजिनीअरिंगमध्ये बीईची पदवी घेतली होती. ते बऱ्याच वेळा घरी इडली सांबारचा नाश्ता करतात.
2. गुजराती स्टाइल दाल
अब्जाधीश अंबानी दांपत्य, मुकेश आणि नीता हे शाकाहारी आहेत. त्यांना पारंपारिक पद्धतीचे, घरगुती जेवण आवडतं. एका वृत्तपत्राच्या रिपोर्टनुसार, 66 वर्षांचे मुकेश अंबानी हे दररोज रात्रीच्या जेवणात गुजराती पद्धतीची डाळ अथवा आमटी खातात.
3. पोळी आणि राजमा
नीता आणि मुकेश अंबानी हे व्यावसायिक शेफने घरी तयार केलेले कमी-कॅलरीयुक्त आणि आरोग्यदायी अन्नाचे सेवन करतात. ते आपल्या आरोग्याच्या बाबतीत एकदम काटेकोर आहेत. त्यांचे व्यस्त वेळापत्रक असूनही, मुकेश अंबानी निरोगी आणि संतुलित आहाराचे पालन करतात. ज्यामध्ये पोळी, आमटी आणि भातासह राजमा सारख्या घरगुती पदार्थांचा समावेश असतो.
4. दही बटाटा पुरी
फेमिनाला दिलेल्या एका मुलाखतीत नीता अंबानी यांनी खुलासा केला होता की त्यांना आणि मुकेश अंबानी यांना अधूनमधून स्ट्रीट फूड खायला आवडतं. “ आमचा प्लान क्षणात बनतो. रात्री उशीरा ते ( मुकेश अंबानी) म्हणतील, चला एक कप कॉफी पिऊ. मग आम्ही सी लाउंजला जातो. किंवा जर दिवसा एखादा प्लान ठरला तर आम्ही स्वाती स्नॅक्सला जातो.. कुठेतरी झटपट भेळ किंवा दही बटाटा पुरी खायला आम्हालां आवडतं” असं त्यांनी नमूद केलं होतं.
5. भेळ
वर नमूद केल्याप्रमाणे, नीता अंबानींच्या म्हणण्यानुसार, मुकेश अंबानी हे स्वाती स्नॅक्समधून दही बटाटा पुरी आणि भेळ सारख्या स्ट्रीट फूडचा आस्वाद घेतात.